Pune, Shivsena VS MNS: आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे सध्या पक्ष बांधणी आणि निवडणूक रणनितीसाठी पुणे शहराकडे विशेष लक्ष देत असल्याचं दिसून येत आहे. राज ठाकरे आजही पुण्याच्या दौऱ्यावर आहेत. पण मनसेच्या रणनितीला मात देण्यासाठी आता शिवसेनेनं मोठी खेळी केली आहे.
शिवसेनेकडून शुक्रवारी शिवसेना उपनेते सचिन अहिर यांनी पुणे संपर्क प्रमुखपदावर नेमणूक करण्यात आली आहे. महत्त्वाची बाब अशी की मनसेमधून शिवसेनेचं शिवबंधन हाती बांधलेल्या आदित्य शिरोडकर यांना पुणे सहसंपर्कपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यामुळे मनसेच्या रणनितीला तोडीस तोड प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न शिवसेनेनं केला आहे.
आदित्य शिरोडकर यांनी मनसेमध्ये शिक्षण विभागाशी संबंधित कामं केली आहेत आणि यात पुण्यात शिक्षणासाठी येणाऱ्या तरुणाईचे प्रश्न व त्यांच्याशी आदित्य शिरोडकर यांचा संपर्क राहिलेला आहे. याचाच विचार करुन आदित्य शिरोडकर यांच्यावर शिवसेनेनं नवी जबाबदारी दिली आहे.
पुणे महापालिकेत जास्तीत जास्त नगरसेवक निवडून आणण्यासाठी शिवसेनेनं रणनिती आखण्यास सुरुवात केली आहे. यात राष्ट्रवादी आणि मनसेतून आलेल्या अनुभवी नेत्यांचा वापर यासाठी केला जाऊ शकतो. याच उद्देशातून सचिन अहिर आणि आदित्य शिरोडकर यांची 'पुणे मिशन'साठी निवड केल्याचं बोललं जात आहे.