पुणे : पुणेकरांनी सहकार्य केल्यामुळेच धरणात पाणी शिल्लक आहे़ त्यामुळे आता धरणामध्ये शिल्लक असलेले पाणी हे पुणेकरांच्या हक्काचे असून आणखी पाणी कपातीला शिवसेनेचा विरोध असल्याचे शिवसेना शहर प्रमुख विनायक निम्हण यांनी सांगितले़ कालवा समितीच्या शनिवारी झालेल्या बैठकीत दौंड आणि इंदापूरसाठी १ टीएमसी पाणी देण्याबाबत चर्चा झाली़ हे पाणी दिल्यास पुणे शहरात आणखी पाणी कपात करावी लागण्याची शक्यता आहे़ याबाबत निम्हण यांनी सांगितले, की पुणेकरांनी निवडून दिल्यामुळेच पालकमंत्री झाल्याची जाणीव गिरीश बापट यांनी ठेवावी. कालवा समितीच्या बैठकीमध्ये पालकमंत्री गिरीश बापट यांनी दौंड इंदापुर साठी १ टी एम सी पाणी देण्याचा आग्रह धरणे हे सर्वत: पुणेकरांशी प्रतारणा करण्यासारखे आहे. गेल्या वर्षी कमी झालेल्या पावसाचे प्रमाण लक्षात घेता पुणेकरांनी शासनास व महापालिकेस या आधीच सहकार्य केले आहे. आत्ता धरणामध्ये शिल्लक असलेले पाणी हे पुणेकरांनी केलेल्या सहकार्यामुळेच शिल्लक आहे व ते पुणेकरांच्याच हक्काचे आहे.इंदापूर, दौंड भागातील मोजक्या गावांचा पाण्याचा प्रश्न हा लक्षात घेऊन त्यांना आपण पर्यायी टँकरची व्यवस्था करता येईल़ एक खासदार, आठ आमदार आणि ३ मंत्री पुणेकरांनी आपल्याला देऊन आपण अश्या पद्धतीने आग्रह धरणे म्हणजे पुणेकरांचा घोर अपमान करण्यासारखे आहे, असे त्यांनी पत्रकात म्हटले आहे़
पाणीकपातीला शिवसेनेचा विरोध
By admin | Published: April 25, 2016 2:46 AM