बारामती - (प्रतिनिधी ) : बारामती इंदापूर मार्गावरील अपघाताचे सत्र सुरूच आहे. गुरुवारी (दि 18)पहाटे भवानीनगर (ता. इंदापूर )येथे परेल-अकलूज शिवशाही बसने ऊसतोडणीसाठी जाणाऱ्या बैलगाडीला जोरदार धडक दिल्याने अपघात झाला. त्यामध्ये बैलगाडीला जुंपलेल्या दोन्ही बैलांचा जागीच मृत्यू झाला आहे, तर एक ऊसतोडणी कामगार गंभीर जखमी झाला आहे. या अपघातानंतर स्थानिकांनी आणि पोलीस प्रशासनाने घटनास्थळी धाव घेतली असून पंचनामा करण्यात येत होता.
मंगळवारी (दि 16 ) याच रस्त्यावर सणसर पाटबंधारे वसाहत, जाचकवस्ती भागात दोन वेगवेगळे अपघात झाले होते. या अपघातात तीन महिलांसह चौघांचा बळी गेला आहे. या घटनेला अवघे 24 तास उलटले आहेत, तोच आज पहाटे पुन्हा भीषण असा अपघात झाला आहे. त्यामध्ये दोन मुक्या जीवांना नाहक जीव गमवावा लागला. अपघातानंतर भवानीनगर पोलीस तातडीने या ठिकाणी पोहचले. अपघातग्रस्त वाहने बाजूला काढत या मार्गावरील वाहतुक सुरळीत केली. तसेच मृत बैलांना जेसीबीच्या साहाय्याने बाजूला करण्यात आले.
दरम्यान, काम पूर्ण झाल्याने येथील रस्ते प्रशस्त झाले आहेत. त्यामुळे वाहनांचा वाढता वेग अपघाताला कारणीभूत ठरत आहे. येथील साइड पट्टयाचें काम पूर्ण न झाल्याने अपघाताचे प्रमाण वाढले आहे. रहदारीच्या भागात गतिरोधक बसविण्याची देखील गरज आहे. महामार्ग पोलिसांनी वाढत्या अपघातांची नोंद घेऊन सणसर गावाला भेट देत नुकतीच आवश्यक उपाय योजनांची चर्चा केली आहे. मात्र, अपघात रोखण्यासाठी योग्य ती खबरदारी घेणे आवश्यक आहे.