शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे म्हणजे प्रचंड उत्साही, ऊर्जामय, प्रेरणादायी आणि शिस्तप्रिय व्यक्तिमत्त्व. गेली २५ वर्षे बाबासाहेबांची काळजी घेण्याची जबाबदारी मला डॉ. रवि लोहकरे (सर्जन), डॉ. नरेंद्र जावडेकर (फिजिशियन), सुनील साठे (हृदयरोगतज्ज्ञ) या सहकाऱ्यांसमवेत मिळाली.
बाबासाहेबांवर प्रेम करणारी माणसं असंख्य. सर्वच क्षेत्रांतल्या दिग्गजांसह अनेकांचा त्यांच्याकडे राबता असतो. कोरोनाच्या काळात त्यांना आवर घालणे अवघड काम होते. पण बाबासाहेबांचं वय लक्षात घेऊन लोकांनी आम्हाला खूप सहकार्य केले. त्यांचे स्वीय सहायक म्हणून काम पाहणारे शैलेश वरखडे आणि सुनील शिरगावकर हे बाबासाहेबांची जिवापाड काळजी घेत आहे.
बाबासाहेबांच्या ऊर्जामयी दीर्घायुष्यात त्यांचा दिनक्रम फार महत्त्वाचा आहे. ते आजही पहाटे ४ ते ४.३० वाजता उठतात. काही वेळ वाचन, मनन आणि चिंतन करतात. काही मुद्दे असतील तर त्यांचं टिपण काढतात. पुन्हा थोडी विश्रांती घेतात. यानंतर चहा, नाष्टा झाल्यावर ध्यानधारणा करून स्वतःला रिफ्रेश करतात. त्यांना फोडणीचा भात, गुळपोळी, पिठलंभाकरी आणि आश्चर्य पिझ्झा, कॅडबरीही फार आवडते. दुपारच्या जेवणात पिठलंभाकरी, वरणभात, कमी तिखट भाजी, तांदळाची, शेवयाची खीर घेतात. संध्याकाळी फळांचा ज्यूस, पालेभाज्यांचे सूप घेतात. रात्री ते जेवत नाही तर फक्त दूध घेतात. सर्व गोळ्या औषधे वेळेवर घेतात.
जेव्हा कधी ते अडचणी आणि नैराश्यात असतात, तेव्हा ते नामस्मरण करत असतात. आजही बाबासाहेबांचे वाचन अफाट आहे. कोणताही मुद्दा मांडताना ते अगोदर त्याचा सखोल अभ्यासपूर्वक व्यक्त होतात. काही चुकलं तर मोठ्यापणाने ती चूक मान्य करण्यातदेखील त्यांना कोणताही कमीपणा वाटत नाही.
एवढी माणसं तुम्हाला कार्यक्रमाला बोलावतात, घरी भेटायला येतात, फोटो काढण्यासाठी, सही घेण्यासाठी धडपडतात किंवा वाढदिवसाच्या दिवशी गर्दी करतात. पण कधीही तुम्हाला त्यांच्यावर रागवताना पाहिलेले नाही. ते म्हणतात की, माझ्याकडे येणारी ही सर्व माझी मुलं, नातवंडं आहेत. आणि आपल्या मुलांवर किंवा नातवंडांवर कधी रागवतो का? पण बाबासाहेब पुरंदरे घडण्यात जसा शिवचरित्राचा मोठा वाटा आहे तसेच माझ्यावर प्रेम करणाऱ्या लोकांचा देखील तितकाच सहभाग आहे. लोकांनी मला त्या वेळी मदत केली नसती तर आज शिवचरित्रनिर्मिती किंवा बाबासाहेब पुरंदरे घडले नसते.
बाबासाहेब वेळेच्या बाबतीत अत्यंत काटेकोर आहे. त्यांना कार्यक्रमाला बोलावले जाते त्या वेळी संयोजकांची मोठी परीक्षा असते. बाबासाहेब दिलेल्या वेळेआधी हजर असतात. एकदा एका कार्यक्रमाला बोलावले होते. त्यांना काही कारणास्तव त्या कार्यक्रमाला जायला १५ मिनिटे उशीर झाला तर बाबासाहेबांनी संयोजकांची माफी मागत त्या संस्थेला चक्क १५ हजारांची देणगी दिली. हे जेव्हा लोकांना कळले तेव्हा लोक गमतीने त्यांना आमच्याकडे पण उशिरा या आणि ते १५ मिनिटे नाही तर चांगलं १ तास या. बाबासाहेबांनी आजही त्यांचा मिस्कील व विनोदी स्वभाव जपलेला आहे. त्यांच्या बोलण्यातून ते अनेक विनोदी किस्से सांगत असतात.
बाबासाहेबांचा आणखी एक पैलू म्हणजे ते उत्तम नकलाकार आहे. याबाबाबतची आठवण खूप भन्नाट आहे. एकदा बाबासाहेबांनी थेट सावरकरांचीच नक्कल केली. कारण एक मुलगा तुमची नक्कल करतोय ही बाब स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या कानावर गेली. मग त्यांनी बाबासाहेबांना बोलावून घेतले व नक्कल करायला सांगितली. त्यांनी हुबेहूब नक्कल केल्यावर सावरकर प्रचंड खूश झाले. दुसऱ्यांच्या नकला करण्याऐवजी स्वतः इतका मोठा हो की लोकांनी तुझ्या नकला केल्या पाहिजे असे सांगितले. हाच त्यांच्या आयुष्यातील 'टर्निंग पॉईंट' ठरला असावा.
एकदा आम्ही नेत्रदानाची मोहीम राबवत असतो. त्या वेळी आम्ही बाबासाहेबांकडे नेत्रदानाचा संदेश मागण्यासाठी गेलो होतो. त्या वेळी ते म्हणाले, की आधी नेत्रदानाचा फॉर्म घेऊन या. मी स्वतः नेत्रदानाचा फॉर्म भरतो. तात्पर्य म्हणजे त्यांनी संदेश देणे आणि कृती करणं या. कधी फरक जाणवू दिला नाही. ते कुणालाही आजतागायत एकेरी नावाने हाक मारत नाही. त्यांच्या वयापेक्षा लहान व्यक्तींनाही ते अदबीने बोलतात.
खूपदा बाबासाहेबांच्या स्वरयंत्राला सूज येते. त्यांच्या आवाजाची समस्या उद्भवते किंवा खराब होतो. या वेळी मी त्यांना काही वेळ बोलणं बंद करण्याचा सल्ला देतो. पण ते म्हणतात, एकेकाळी माझा अत्यंत आवाज खूप चांगला होता. आता मी माझा आवाज ऐकतो तेव्हा दुसऱ्याच कुणाचा तरी आवाज वाटतो. शिवचरित्रावर बोलणे आणि ते लिहिणे हा माझा श्वास आहे. तेच जर थांबलं तर माझा श्वास गुदमरेल. इतकं शिवचरित्रावर समर्पण आहे. म्हणूनच त्यांच्या हातून इतकं मोठं कार्य घडलं.
दोन दिवसांपूर्वी मी कोकणात अतिवृष्टी झालेल्या ठिकाणी रुग्णसेवेसाठी गेलो होतो. ही बाब बाबासाहेबांना समजली. तर त्यांनी त्यांच्या परिचयाच्या १० ते १२ लोकांकडे माझी विचारपूस केली. ही गोष्ट आजच्या काळात खूप दुर्मिळ झाली आहे.