पुणे: उद्धव ठाकरे यांनी नुकतीच वंचित बहुजन आघाडीशी युती केली. मात्र, त्याचा काहीही फायदा ठाकरे यांना होणार नाही. अशी प्रतिक्रिया केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दिली आहे. ते पुण्यात पत्रकारांशी बोलत होते.
उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीत युतीची जाहीर घोषणा केली आहे. त्यामुळे राज्याच्या राजकारणात आगामी काळात मोठे बदल होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.. देशाची वाटचाल हुकुमशाहीकडे सुरु आहे. इथली लोकशाही टिकवून ठेवण्यासाठी आम्ही एकत्र आलो, अशी संयुक्त भूमिका प्रकाश आंबेडकर तसेच ठाकरे यांनी मांडली होती.
आठवले म्हणाले, शिवशक्ती व भीमशक्तीचा प्रयोग दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांनीच केला होता. हा प्रयोग मात्र, शिवशक्ती वंचितशक्ती असा आहे. उद्धव ठाकरे यांनी नुकतीच वंचित बहुजन आघाडीशी युती केली. मात्र, त्याचा काहीही फायदा ठाकरे यांना होणार नाही. कसबा व चिंचवड मतदारसंघाची पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी अशी अपेक्षा आहे. मात्र, निवडणूक झाल्यास रिपब्लिकन पक्ष भाजपच्या पाठीशी राहील असेही त्यांनी यावेळी सांगितले आहे.
आमचे आजोबा एकमेकांचे समकालीन आणि एकमेकांचे सहकारी
देशात ठाकरे आणि आंबेडकर या नावाला इतिहास आहे. आमचे आजोबा एकमेकांचे समकालीन आणि एकमेकांचे सहकारी होते. दोघांनीही त्या काळात वाईट प्रथांवर आघात केला. आताही राजकारणात वाईट प्रघात सुरु आहे. त्यामुळे आम्ही आज एकत्र येण्याचा निर्णय घेतला असल्याचे उद्धव ठाकरे यांनी युतीची घोषणा झाल्यावर सांगितले होते.