बारामती : बारामती शहरातील ऐतिहासिक श्रीमंत बाबूजी नाईक वाड्यात ‘शिवसृष्टी’ साकारण्याचा ठराव आज नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत मंजूर करण्यात आला. सध्या या वाड्यावर (भुईकोट किल्ला) राज्य शासनाची मालकी आहे. शासनाच्या ताब्यातून जागा घेऊन ‘शिवसृष्टी’ साकारण्याचा प्रस्ताव देण्यात येणार आहे. सभेच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष योगेश जगताप होते. उपनगराध्यक्षा ज्योती बल्लाळ, प्रभारी मुख्याधिकारी नानासाहेब कामठे यांच्यासह नगरसेवक, नगरसेविका उपस्थिती होत्या. नगरसेवक किरण गुजर यांनी हा मुद्दा उपस्थित केला. बाबुजी नाईक वाड्याला ऐतिहासिक महत्त्व आहे. या वाड्यात शासकीय कार्यालयांचे कामकाज चालत होते. आता फक्त पोलीस ठाणे कार्यरत आहे. शासकीय कार्यालये नवीन प्रशासकीय इमारतीमध्ये स्थलांतरित झाली आहेत. भाजप-सेना युती शासनाने ऐतिहासिक वास्तूंचे जतन करण्यासाठी मोहीम हाती घेतली आहे. त्यानुसार, बाबूजी नाईक वाड्याची दुरुस्ती करून ‘शिवसृष्टी’ साकारण्याचा प्रस्ताव आहे. या वाड्याभोवती कविवर्य मोरोपंत स्मारक, श्रीधरस्वामी, श्री काशिविश्वेश्वर मंदिर, श्री सिद्धेश्वर मंदिर, सिद्धिविनायक मंदिर आहेत. या सर्व मंदिरांना ऐतिहासिक महत्त्व आहे. या वाड्याच्या पडझडीचे नूतनीकरण करून बाबूजी नाईकांचे दालन विकसित करून शिवसृष्टी निर्माण केल्यास बारामतीच्या वैभवात भर पडणार आहे. कोल्हापूरच्या छत्रपती शाहूमहाराजांच्या स्मारक उभारणीचे काम केले जाईल. त्याचअनुषंगाने बाबुजी नाईक वाड्यात ‘शिवसृष्टी’ साकारण्याचा प्रस्ताव आहे. त्यासाठी आवश्यक आराखडे, तांत्रिक मंजुरी, अंदाजपत्रक तयार करण्याला मंजुरी देण्यात आली. या प्रस्तावाला बहुमताने मंजुरी देण्यात आली. दृक्श्राव्य माध्यमातील व्यवस्था केली जाणार आहे. ‘शिवसृष्टी’ साकारण्यासाठी इतिहासतज्ज्ञांचे मार्गदर्शन घेतले जाणार आहे. या वेळी नगरसेवक विक्रांत तांबे, सुभाष ढोले, सुनील पोटे, श्याम इंगळे, नगरसेविका पौर्णिमा तावरे, गटनेत्या भारती मुथा, संजय लालबिगे यांनी ‘शिवसृष्टी’ साकारण्यासाठी सर्व परवानग्या प्रशासनाने घ्याव्यात, असे मत मांडले. (प्रतिनिधी)
वाड्यात साकारणार ‘शिवसृष्टी’
By admin | Published: June 16, 2016 4:15 AM