लासुर्णे : इंदापूर अर्बन बँकेचे संचालक व शेतकरी वसंत पवार यांनी आत्महत्येपूर्वी लिहलेल्या चिठ्ठीत आत्महत्येला जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे व पालकमंत्री गिरीश बापट व पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांना जबाबदार धरले आहे. या चिठ्ठीनुसार पवार यांच्या आत्महत्येला कारणीभूत अधिकारी व मंत्र्यांना जबाबदार धरून त्यांच्यावर गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी शरद जोशी विचार मंच शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विठ्ठल पवार यांनी निवेदनाद्वारे केली आहे.बेलवाडी (ता. इंदापूर) येथील पवार यांनी नीरा-डावा कालव्याचे पाणी वेळेवर मिळत नसल्याच्या कारणावरून विहिरीत उडी टाकून आत्महत्या केली. पवार यांनी मृत्यूपूर्वी लिहलेल्या चिठ्ठीत मंत्री शिवतारे व बापट तसेच पाटबंधारे विभागाचे अधिकारी यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे. याच चिठ्ठीचा संदर्भ घेऊन संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विठ्ठल पवार यांनी तहसीलदार श्रीकांत पाटील व वालचंदनगर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक उत्तम भजनावळे यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे कारवाईची मागणी केली आहे.अधिकारी व मंत्र्यांवर गुन्हे दाखल न केल्यास तीव्र आंदोलन छेडणार असल्याचा इशारा दिला आहे. मागील दोन ते तीन वर्षांपासून जलसंपदा विभागाकडून शेतीला वेळेवर पाणी मिळत नसल्याने पिके जळून जात आहेत. परिणामी, आर्थिक अडचणीमध्ये वाढ होऊन कर्जबाजारीपणामुळे पवार यांनी विहिरीत उडी टाकून आत्महत्या केली. पवार यांनी मृत्यूपूर्वी चिठ्ठी लिहून ठेवली आहे. या चिठ्ठीत जलसंपदा विभागाचे मंत्री विजय शिवतारे व पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट तसेच पाटबंधारे विभागाचे अधिकारी यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची मागणी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विठ्ठल पवार यांनी केली आहे.
शिवतारे, बापटांवर गुन्हे दाखल करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2018 2:50 AM