पुणे : खडकवासला वीजपूरवठा उपकेंद्रातून बाहेर जाणाऱ्या क्र. 2च्या वाहिनीच्या फिडर पिलरमध्ये माेठा साप शिरल्याने शार्टसर्किट हाेऊन 5 वाहिन्यांचा वीजपुरवठा खंडित झाला. त्यामुळे डिएसके विश्व, कोलेवाडी, नांदेड गाव, धायरीचा काही परीसरातील सुमारे 12 हजार नागरिकांच्या घरची बत्ती गुल झाली हाेती. परिणामी नागरिकांना त्यांचा दिवस उकाड्यात घालवावा लागला.
पर्वती 220 केव्ही उपकेंद्रातून खडकवासला क्र. 1 व क्र. 2 वाहिनीद्वारे खडकवासला उपकेंद्राला वीजपुरवठा केला जातो. तसेच खडकवासला उपकेंद्रातून बाहेर जाणार्या एका वीजवाहिनीद्वारे डिएसके उपकेंद्राला वीजपुरवठा केला जातो. आज सकाळी 9.35 वाजताच्या सुमारास खडकवासला क्र. 2 वाहिनीद्वारे होणारा वीजपुरवठा खंडित झाला. त्यामुळे खडकवासला उपकेंद्रातील दोन आऊटगोईंग वाहिन्यांचा वीजपुरवठा बंद पडला. या दोनपैकी एका वाहिनीवरून डिएसके उपकेंद्राला होणारा वीजपुरवठा बंद झाल्याने या उपकेंद्रातील तीन आऊटगोईंग वाहिन्यांचा सुद्धा वीजपुरवठा खंडित झाला. परिणामी डिएसके विश्व, कोलेवाडी, नांदेड गाव, धायरीचा काही परिसर या भागातील सुमारे 12 हजार वीजग्राहकांचा वीजपुरवठा खंडित झाला होता. पर्यायी व्यवस्थेतून वीजपुरवठा करण्याचे प्रयत्न करण्यात आले पण उन्हामुळे विजेची मागणी अधिक असल्याने भारव्यवस्थापन शक्य होऊ शकले नाही.
सुमारे पाऊण तासाच्या पेट्रोलिंगनंतर गोयलगंगा गार्डनमधील 22 केव्ही खडकवासला क्र. 2 वाहिनीच्या फिडर पिलरमध्ये मोठा साप शिरल्याने शॉर्टसर्कीट झाल्याचे समाेर आले. हा साप जळाल्याने मृतावस्थेत दिसून आला. तसेच जाईंट व केबल जळालेले आढळून आले. दरम्यान फिडर पिलरमधील जाईंट व केबल दुरुस्तीचे काम तात्काळ सुरु करण्यात आले. केबलच्या दुरुस्तीसह तीन ठिकाणी जाईंट लावल्यानंतर दुपारी 2.55 वाजता पाच वीजवाहिन्यांचा तसेच त्यावरील परिसराचा वीजपुरवठा पूर्ववत करण्यात आला.