पिरंगुट : मुळशी तालुक्यातील ३६ ग्रामपंचातीच्या निवडणुकांचे निकाल आज जाहीर झाले. यामध्ये प्रस्थापितांना धक्का देत निवेदितांना मतदार राजाने आपला कौल दिला. आज सकाळी नऊ वाजल्यापासून निकाल ऐकण्यासाठी कासारआंबोली येथील राणी लक्ष्मीबाई मुलींच्या सैनिकी शाळेबाहेर मोठी गर्दी केली होती.
शुक्रवारी (दि. १५) तालुक्यातील ३६ ग्रामपंचायतीसाठी मतदान झाले. त्यानंतर आजच्या निकालाकडे तालुक्याचे लक्ष लागून राहिले होते. आज सकाळपासूनच नागरिकांनी गर्दी केली होती. अनेक प्रस्थापितांच्या गावात निवडणूक होती. यामध्ये विद्यमान सभापती पांडुरंग ओझरकर, ज्येष्ठ नेते राजाभाऊ हगवणे,जिल्हा परिषद सदस्य शंकर मांडेकर,अंजली कांबळे, माजी सभापती विद्यमान सदस्या कोमल साखरे,काँग्रेसचे अध्यक्ष गंगाराम मातेरे,शिवसेनेचे माजी तालुका प्रकाश भेगडे,रविकांत धुमाळ, शिवसेनेचे ज्येष्ठ नेते नानासाहेब शिंदे,राष्ट्रवादीचे माजी अध्यक्ष सुनील वाडकर,भारतीय विद्यार्थी सेनेचे राम गायकवाड आदींच्या गावाचा यात समावेश होता
भरे,पौड आणि चाले येथे दोन उमेदवारांना समान मते मिळाली. त्यामुळे याठिकाणी ईश्वरी चिठ्ठी काढून उमेदवार निवडण्यात आले.भरे येथील वॉर्ड क्रमांक दोन मध्ये जगदीश सुभाष ववले आणि विवेक संपत ववले यांच्यात लढत होती. यामध्ये दोघांनाही समान म्हणजे १४८ मते मिळाली. त्यामुळे याठिकाणी चिट्ठी काढण्यात आली.शिवन्या समीर जाधव या चार वर्षीय मुलीच्या हस्ते तहसीलदार अभय चव्हाण,निवडणूक निर्णय अधिकारी व उमेदवारांच्या प्रतिनिधींच्या उपस्थित चिठ्ठी काढण्यात आली. यामध्ये जगदीश सुभाष ववले यांच्या नावाची चिठ्ठी आल्याने त्यांना विजयी घोषित करण्यात आले.
दरम्यान मोजणीच्या वेळी अनेक उमेदवारांनी मोजणी प्रक्रियेवर आक्षेप घेतला.मात्र तहसीलदार अभय चव्हाण यांनी तात्काळ उपस्थित प्रतिनिधीच्या शंकाचे निरसन केले.मतमोजणी केंद्रावर पौड पोलिसांच्या वतीने योग्य तो बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.पोलिस उपअधीक्षक अमृत देशमुख, वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक धुमाळ सहाय्यक पोलिस निरीक्षक विनायक देवकर, भालचंद्र शिंदे, उपनिरीक्षक श्रीकांत जाधव, मृगदीप गायकवाड यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.प्रत्येकाची तपासणी करून प्रवेश दिला जात होता.
आजीचे मत ठरले विजयी मत...
वाळेण(ता. मुळशी) येथील वार्ड १ मध्ये विजय मुगुट साठे यांचा अवघ्या एक मताने विजय झाला. त्यांना १२७ तर विरोधी उमेदवार संजय चिंधु साठे यांना १२६ मते मिळाली. विजयी उमेदवार विजय साठे यांच्या ११३ वार्षीय आजी सरुबाई शंकर साठे यांनी मतदान केंद्रावर जाऊन आपल्या नातवाला मतदान रुपी आशिर्वाद दिला. मात्र त्याच रात्री आजी बाईने अखेरचा श्वास घेतला.
फोटो ओळ : कासार आंबोली येथे मत मोजणी प्रक्रिया सुरू असतानाच क्षण
2 )कासार आंबोली येथे मतमोजणी सुरू असताना निकाल ऐकण्यासाठी आतूर होऊन बसलेले नागरिक