बारामतीतील माजी सरपंच जयदिप तावरे यांना धक्का; रविराज तावरे गोळीबार प्रकरणी पुन्हा अटक होणार
By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2021 12:21 PM2021-08-17T12:21:15+5:302021-08-17T12:21:48+5:30
१८ ऑगस्ट पर्यंत शरण येण्याचे मोक्का न्यायालयाचे आदेश
बारामती : माळेगाव येथील रविराज तावरे गोळीबारप्रकरणी मोक्कांतर्गत गुन्ह्यात जामीन मिळालेले माळेगावचे (ता. बारामती) माजी सरपंच जयदीप दिलीप तावरे यांना धक्का बसला आहे. त्यांचा गुन्ह्यात सहभाग नसल्याचा पोलिसांनी सादर केलेला अहवाल मोक्का न्यायालयाने फेटाळला असून, जयदीप यांना १८ ऑगस्टपर्यंत शरणागती पत्करण्याचा आदेश दिला आहे.
मोक्का न्यायालयात आम्ही तपासाअंती सादर केलेला अहवाल नाकारण्यात आला असून, जयदीप यांना १८ तारखेपर्यंत शरण येण्याचे आदेश न्यायालयाने दिल्याचे उपविभागिय पोलिस अधिकारी नारायण शिरगावकर यांनी सांगितले. ३१ मे रोजी रविराज तावरे यांच्यावर माळेगावात गोळीबार झाला होता. याप्रकरणी पोलिसांनी प्रशांत पोपटराव मोरे, टॉम ऊर्फ विनोद पोपटराव मोरे, राहुल ऊर्फ रिबेल कृष्णांत यादव व एका अल्पवयीनावर गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर अवघ्या १५ दिवसांत त्यांच्यावर मोक्कांतर्गत कारवाई करण्यात आली. रविराज तावरे यांनी रुग्णालयात उपचार घेताना दिलेल्या जबाबावरून याप्रकरणी पोलिसांनी जयदीप तावरे यांच्यावर कटात सहभागी असल्याचा गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली होती. मोक्कांतर्गत त्यांच्यावरही कारवाई झाली होती. जयदीप तावरे यांच्यावरील कारवाईनंतर माळेगावातील राजकीय वातावरण चिघळले होते.
जयदीप यांना जुलैअखेरीस जामीन मंजूर झाला होता
जयदीप यांच्या समर्थनार्थ गाव बंद ठेवत निषेध सभा घेण्यात आली होती. रविराज तावरे यांनी राजकीय हेतूने जयदीप यांना गोवल्याचा आरोप करीत तसे निवेदन पोलिसांना देण्यात आले होते. पोलिसांनी याप्रकरणी पुन्हा चौकशी केल्यानंतर जयदीप यांचा या प्रकरणाशी संबंध नसल्याचा अहवाल उपविभागीय पोलिस अधिकारी नारायण शिरगावकर यांनी मोक्का न्यायालयाकडे सादर केला. या अहवालामुळे जयदीप यांना जुलैअखेरीस जामीन मंजूर झाला होता. परंतु, आता मोक्का न्यायालयाने पोलिसांनी दिलेला अहवाल अमान्य केला आहे.