वाकड : महावितरणकडून दरमहा ३० ते ३१ दिवसांच्या चक्रासाठी बिलाची आकारणी केली जाते. पण या वेळी बिलिंग चक्राचा अवधी फक्त १७ दिवसांचा आहे. तसा हा कालावधी प्रत्यक्षात १७ दिवसांचा असेल, तर बिलदेखील तेवढ्याच अवधीचे असायला हवे. पण रीडिंग प्रत्यक्षात दुप्पट असून बिलाची आकारणीदेखील अधिक दराने झाल्याने ग्राहकांना मोठा शॉक बसला आहे. सुमारे २० हजार ग्राहकांना हा फटका बसल्याचे महावितरणने सांगितले असून, पुढील बिलात रक्कम कपात करून देणार असल्याचे एका उच्चपदस्थ अधिकाऱ्याने सांगितले. पहिल्या १०० युनिटसाठी २.९८ रुपये दर असताना ४.७३ दराने तर १०० युनिटच्या नंतरच्या स्लॅबसाठी ६.७३ रुपये प्रमाणे दर आकारणे आवश्यक असताना ९ रुपयांपेक्षा अधिक दर अधिक दर आला आहे. त्यामुळे प्रत्यक्षात कमी युनिटचा वापर झाला असताना आकारणी मात्र जवळ जवळ दुपटीच्या घरात गेल्याने नागरिक चांगलेच संतापले आहेत. चूक झाल्याचे कबूल करीत महावितरणने यावर तोडगा म्हणून महावितरणच्या आयटी विभागाने एक नम्र निवेदन जारी केले आहे. त्यात ते म्हणतात, वाकड परिसरातील पीसी ६ च्या वीज ग्राहकांना माहे फेब्रुवारीचे वीज बिले ही थोड्या फार प्रमाणात जास्त आलेली आहेत. कारण सदर बिलिंगचा कालावधी एक महिन्याचा असतानाही २९ जाने. ते १४ फेब्रु. २०१७ दरम्यान १३ ते १८ दिवस झालेला आहे. याबाबत आयटी (माहिती व तंत्रज्ञान) विभागात काम सुरू असून, त्याबाबत आपणास लवकरच अवगत करण्यात येईल. तसेच वाढीव रक्कम पुढील बिलात वजावट करून देण्यात येईल. कृपया सहकार्य करावे. आलेली वीजबिले भरावी, अशी विनंती. या पार्श्वभूमीवर ग्राहकांची मागणी आहे की, चुकीच्या सर्व बिलांमध्ये ग्राहकाची तक्रार येण्याची वाट न पाहता तत्काळ दुरुस्ती करावी. बिलभरणा मुदत वाढवून द्यावी, तोपर्यंत कोणाही ग्राहकाचा वीजपुरवठा खंडित करू नये. ज्या ग्राहकानी बिल भरणा केला असेल त्याची जास्तीची रक्कम पुढील बिलात वळती करावी. अशा प्रकारे चुकीची दुरुस्ती होत असताना त्यात पारदर्शकता ठेवावी. येथून पुढे बिल आकारणी यंत्रणा अशा पद्धतीने राबवावी की, सदैव वीज खंडित होणाऱ्या यंत्रणेपुढे हतबल असलेल्या ग्राहकास किमान बिल आकारणी यंत्रणेच्या मनमानी कारभारास तोंड देण्याची वेळ येऊ नये. अशा अनेक मागण्या ग्राहकांनी केल्या. (वार्ताहर)
महावितरणचा ग्राहकांना शॉक
By admin | Published: March 17, 2017 2:13 AM