वडगाव मावळ (पुणे) : मावळात माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला धक्का बसला असून, तालुकाप्रमुख राजू खांडभोर यांच्यासह इतर मोजके पदाधिकारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटात सहभागी झाले आहेत.
मावळचे खासदार श्रीरंग बारणे हे शिंदे गटात सामील झाल्याने मावळ तालुक्यातील शिवसेनेचे पदाधिकारी शिंदे गटात सामील झाले आहेत. तालुकाप्रमुख राजू खांडभोर, उपजिल्हाप्रमुख शरद हुलावळे, संघटक अंकुश देशमुख, विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष धनंजय नवघणे व अन्य काही पदाधिकारी शिंदेच्या गटात सामील झाले आहेत, अशी माहिती तालुकाप्रमुख राजू खांडभोर यांनी दिली
आम्ही शिवसेना सोडली नाही- खांडभोर
तालुक्यातील काही पदाधिकाऱ्यांची खासदार श्रीरंग बारणे यांच्याबरोबर बैठक झाली. त्यावेळी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबरोबर आम्ही चर्चा केली. बाळासाहेब ठाकरे यांचे विचार पुढे नेण्यासाठी आम्ही बारणे यांच्या मार्गदर्शनाखाली शिंदे गटात सामील झालो आहोत.
मावळात शिवसेनेला काही फरक पडणार नाही- मच्छिंद्र खराडे
खासदार श्रीरंग बारणे हे शिवसेनेशी एकनिष्ठ नव्हते ते गद्दारी करणार हे मी पहिल्या दिवशीच पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, खासदार संजय राऊत, संपर्क प्रमुख सचिन आहेर यांना सांगितले होते. तालुक्यातील जे काही मोजके त्यांच्या बरोबर शिंदे गटात सामील झाले आहेत. त्याचा मावळातील शिवसेनेवर काहीही फरक पडणार नाही. उलट ते गेल्याने शिवसेना बळकट होईल, आज जरी मी पदावर नसलो तरी शिवसेना भक्कम करण्यासाठी मी सर्वात पुढे उभा राहीन, असे मच्छिंद्र खराडे यांनी सांगितले.