कदमवाकवस्ती : सध्या कोरोनाच्या वाढत्या संकटामुळे लग्नसोहळा २५ व अंत्यविधीसाठी वीस लोकांपर्यंत परवानगी दिलेली आहे.परंतु पूर्व हवेलीतील कदमवाकवस्ती परिसरात एका कुटुंबातील एक सत्तर वर्षीय जेष्ठ नागरिक अल्पशा आजाराने मृत्यमुखी पडल्यानंतर त्याच्या अंत्यविधीला अंदाजे शंभर लोकांच्या उपस्थितीत होते. तसेच अंत्यविधी करताना मृत व्यक्तीचे पाय धुवून ते पाणी मृताच्या नातेवाईकांनी पिल्याची खळबळजनक घटना कदमवाकवस्ती परिसरातील सामाजिक कार्यकर्ते राम भंडारी यांनी उघडकीस आणली आहे.
शासनाने अंत्यविधीसाठी वीस लोकांची परवानगी दिलेली आहे.परंतु पूर्व हवेलीमध्ये कोरोना रुग्णांची संख्या धोकादायकरित्या वाढत असून देखील नागरिक मात्र अंत्यविधीसाठी शेकडोंच्या संख्येने गोळा होत असून स्वतःचा व दुसऱ्याच्या जीव धोक्यात घालत आहेत.
सामाजिक कार्यकर्ते राम भंडारी यांनी ही गंभीर बाब लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र मोकाशी यांच्या निदर्शनास आणली. तेव्हा त्यांनी या संदर्भात माहिती घेऊन दोषीविरोधात कठोर कारवाई करण्याचे आश्वासन दिले.अशी गंभीर बाब कोरोनाच्या संकटकालीन वेळेत केल्याने मृताच्या घराजवळील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
लग्न सोहळा किंवा अंत्यविधी कोरोनाचे नियम तोडून व परिसराला धोक्यात टाकून करत असेल तर अशी माहिती नागरिकांनी त्वरित लोणी काळभोर पोलिसांनी द्यावी.आमचे बिट मार्शल दहा मिनिटात आपल्या परिसरात येतील अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी यांनी दिली.