पुणे : पुणे तिथे काय उणे असे म्हटले जाते. कुठलीही गोष्ट नियमाच्या बाहेर जाऊन केल्याशिवाय पुणेकरांना काही चैन पडत नाही. याचा प्रत्यय लॉकडाऊनच्या काळात गुन्हे दाखल झालेल्या आकडेवावरून येते. शहरात लॉकडाऊन जाहीर झाल्यापासून आतापर्यत जमावबंदीचे 24 हजार 738 गुन्हे दाखल झाले आहेत. तर विनाकारण रस्त्यावर फिरणारी 23 हजार 946 वाहने जप्त करण्यात आली आहे. अशी माहिती पोलीस उपायुक्त (गुन्हे शाखा) बच्चन सिंह यांनी दिली आहे. याशिवाय कलम 188 अर्थात संचारबंदीच्या नियम डावलणाऱ्यांची संख्या कमी नसून तब्बल 7 हजार 361 नागरिकांवर सरकारी आदेशाचे पालन न केल्याप्रकरणी कारवाई करण्यात आली आहे. कोरोनाचा वाढता संसर्ग टाळण्यासाठी पोलीस प्रशासन सातत्याने नागरिकांना घराबाहेर पडू नका. विनाकारण रस्त्यावर फिरू नका. जो भाग आरोग्याच्या कारणास्तव बंद करण्यात आला आहे त्याठिकाणी गर्दी करू नका. असे आवाहन करून देखील त्याकडे नागरिकांनी दुर्लक्ष केल्याचे दिसून आले आहे. अशातच गेल्या काही दिवसांपासून मॉर्निग वॉकला जाणाऱ्यांची संख्या वाढली असून अशा नागरिकांना पोलिसांनी अद्दल घडवली आहे. कोरोनाचे गंभीर संकट असतानाही 'प्रभातफेरी' साठी बाहेर पडणाऱ्या 126 नागरिकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. तर विनामास्क फिरणाऱ्या 127 जणांना दंड ठोठावण्यात आला आहे. सध्या शहरातील 22 ठिकाने बंद करण्यात आली आहेत. यातील काही ठिकाणे 'हॉट स्पॉट' आहेत.जागोजागी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. कडेकोट सुरक्षा आहे. विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांवर पोलीस प्रशासन बारकाईने लक्ष ठेवून आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी या भागात संचारबंदी, जमावबंदी आहे. नागरिकांना सोशल डिस्टन्स ठेवण्याचे आवाहन पोलिसांकडून केले जात आहे. मात्र अद्याप काही नागरिकांमध्ये कोरोनाविषयक पुरेसे गांभीर्य नसल्याचे पाहावयास मिळत आहे. यासगळ्यात ज्यांना अत्यावश्यक सेवेचे पास देण्यात आले आहेत अशा व्यक्ती, डॉक्टर, पोलीस अधिकारी, कर्मचारी, तसेच अत्यावश्यक वस्तूंची विक्री करणारी दुकाने यांना सवलत देण्यात आली आहे.
अबब! लॉकडाऊनच्या काळात पुणे शहरात जमावबंदीचे २४ हजार गुन्हे दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2020 8:19 PM
शिस्तप्रिय अशी ओळख असलेल्या पुणेकरांकडून बेशिस्तपणाचे दर्शन
ठळक मुद्देसध्या शहरातील 22 ठिकाने बंद; यातील काही ठिकाणे 'हॉट स्पॉट' 24 हजार वाहने केली जप्त