पुणे : रुबी हॉल क्लिनिकमधील तब्बल २५ जणांना कोरोना विषाणुची लागण झाल्याचे समोर आले आहे. त्यामध्ये १९ परिचारिका व अन्य सहा कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. एकाच रुग्णालयातील एवढे कर्मचारी बाधित होण्याची पुण्यातील ही पहिलीच घटना आहे. त्यामुळे रुग्णालय प्रशासनाने संपुर्ण एक इमारत या रुग्णांसाठी केली आहे. दरम्यान, या कर्मचाऱ्यांमुळे अन्य रुग्णांना संसर्ग झाला नसल्याची माहिती रुग्णालयाचे मुख्य कार्यकारी अधिकारी बोमी भोट यांनी दिली.रुबीमध्ये दि. १० एप्रिल रोजी पहिल्यांचा एका परिचारिकेला कोरोनाचा संसर्ग झाला होता. त्यानंतर दक्षता म्हणून प्रशासनाने २० हून अधिक परिचारिकांना क्वारंटाईन केले होते. त्यानंतर प्रशासनाकडून संबंधित परिचारिका तसेच अन्य कर्मचाऱ्यांची चाचणी घेण्यात आली. त्यामध्ये मागील १० दिवसांत २५ जणांना लागण झाल्याचे समोर आले आहे. याविषयी भोट यांनी दिलेल्या माहितीनुसार, पहिली परिचारिका रेड झोनमधील कासारवाडी येथील आहे. त्यानंतर जवळपास १ हजार कर्मचाऱ्यांची तपासणी करण्यात आली. रुग्णालयात येणारा प्रत्येक रुग्ण, तसेच कर्मचाऱ्यांचा त्यात समावेश आहे. त्यापैकी २५ जण पॉझिटिव्ह आडळून आले आहेत. त्यातील कोणालाही कोरोनासदृश लक्षण नसून त्यांची प्रकृती स्थिर आहे. कोणालाही व्हेंटिलेटर ची गरज भासली नाही. या सर्वांचे विलगीकरण केले असून ही साखळी विस्तारण्यापासून रोखले आहे .बाधितांच्या संपर्कातील लक्षण असलेल्या व नसलेल्या प्रत्येक व्यक्तीचा शोध घेण्यात येत आहे. आमच्या समन्वित आणि सर्वसमावेशक दृष्टिकोनामुळे एकही रुग्ण या घटनेने संक्रमित झाला नाही. सध्या १९ परिचारिका, ३ सहाय्यक कर्मचारी आणि तीन क्लिनिकल सहायकांचे चे विलगीकरण करण्यात आले असून त्यांच्या संपर्कात आलेले व्यक्ती शोधून त्यांच्या चाचण्या घेण्यात आल्या आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून आम्ही हॉस्पिटल मधील एक पूर्ण इमारत संभाव्य कोविड -१९ रुग्णांसाठी समर्पित केली आहे. संसर्ग रोखण्यासाठी नियमावलीचे पालन केले जात आहे, असे भोट यांनी स्पष्ट केले.---------------
--