पुणे - भटक्या कुत्र्यांच्या त्रासातून सुटका करुन घेण्यासाठी काहीजण टोकाचा मार्ग अवलंबतात. अशीच एक भीषण घटना पुण्यात समोर आली आहे. पॅनकार्ड रोडवरील बानेर वस्तीमध्ये चार भटक्या कुत्र्यांना जिवंत जाळण्यात आले तसेच 16 कुत्र्यांना विषप्रयोग करुन ठार मारण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली. टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिले. या प्रकारामुळे पुण्यातील प्राणी प्रेमींना मोठा धक्का बसला आहे. एएसीटी इंडिया या एनजीओच्या सदस्यांना तपासामध्ये कुत्र्यांच्या मृतदेहाचे जळालेले अवशेष तसेच कुजलेल्या अवस्थेतील कुत्र्यांचे मृतदेह सापडले.
एनजीओच्या सदस्यांना बानेर जवळच्या झुडपांमध्ये कुत्र्यांचे सापळेही सापडले. त्यामुळे यापूर्वीही या परिसरात मोठया प्रमाणावर भटक्या कुत्र्यांना ठार मारण्यात आले आहे. एएसीटी इंडियाच्या सदस्यांनी पुणे पोलिसांना या घटनेची माहिती दिली. 28 सप्टेंबरला पुणे पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. कुत्र्यांचे शवविच्छेदन अहवाल मिळाल्यानंतर बुधवारी एफआयआर दाखल करण्यात येईल. एएसीटी इंडियाच्या सदस्यांनी कुत्र्यांबरोबर झालेल्या या अमानुष कृत्याबद्दल परिसरातील नागरीकांशी चर्चा केली. त्यावेळी तिथल्या लोकांनी घटनास्थळाजवळ असलेल्या ऑफीसकडे बोट दाखवले. त्या ऑफीसशी संबंधित असलेल्या काहीजणांनी चार कुत्र्यांना रशीने बांधले. त्यांना 50 मीटरपर्यंत फरफटत नेले तिथे त्या कुत्र्यांच्या अंगावर पेट्रोल ओतून त्यांना पेटवून दिले.
कुत्र्यांचे मृतदेह जळून राख झाले होते. फक्त हाड आणि कवटीकडचा भाग सापडला. हेच अवयव शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत. जेव्हा या कुत्र्यांना खेचून आणले तेव्हा ते मृतावस्थेत होते की, बेशुद्धावस्थेत त्याची खात्री नसल्याचे काही जणांनी सांगितले. या परिसरात आतापर्यंत 21 कुत्र्यांचे मृतदेह सापडले आहेत.
एएसीटी इंडियाच्या प्रतिनिधी नीना राय यांनी सांगितले कि, 28 सप्टेंबरला जेव्हा मी पहिल्यांदा इथे आले त्यावेळी 100 मीटरच्या परिसरात मला दोन कुत्रे आणि कुत्र्याचे पिल्लू मृतावस्थेत आढळले. आणखी तपास केल्यानंतर 11 कुत्र्यांचे मृतदेह सापडले. हे कुत्र्यांचे मृतदेह अत्यंत वाईट अवस्थेत होते. मागच्या काही वर्षात प्राण्यांवरील अत्याचाराच्या घटना वाढल्या आहेत. मागच्या महिन्यात मुंबईत चेंबूरमध्ये एका गृहनिर्माण सोसायटीच्या सुरक्षारक्षकाला कुत्र्यावर लैंगिक अत्याचार केल्या प्रकरणी अटक करण्यात आली होती.