पुणे : जादूटोणा, अंधश्रद्धा यांचा वापर करत बुवा-बाबांकडून फसवणूक होण्याच्या घटना वाढल्या आहेत. तसेच खोटे आमिष दाखवत किंवा भूतबाधेची भीती दाखवत भोंदू बाबांनी महिलांवर अत्याचार केल्याच्या घटना देखील प्रकर्षाने समोर येत आहे. असाच धक्कादायक प्रकार पुण्यातील एका कुटुंबियांसोबत घडला आहे. यामध्ये कुटुंबातील सदस्यांच्या मृत्यूची भीती दाखवत तब्बल पावणे सात लाखांची फसवणूक केली गेली आहे.
याप्रकरणी कोंढवा पोलीस ठाण्यात अबिजुर फतेहपुर वाला यांनी फिर्याद दिली आहे.त्यानुसार जादूटोणाविरोधी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या फिर्यादीनुसार पोलिसांनी अटक केलेल्या भोंदू बाबाचे नाव कुतूबुद्दिन नजमी असे आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील कोंढवा परिसरात राहणाऱ्या कुटुंबाला एका भोंदूबाबाने तुमच्या संपूर्ण कुटुंबावर जादूटोणा करण्यात आल्याचे सांगत यामध्ये तुमच्या मुलासह कुटुंबातील इतर सदस्यांचा मृत्यू देखील होऊ शकती अशी भीती दाखवली. आणि जर कुटुंबातील लोकांवरचे मृत्यूचे हे संकट जर टाळायचे असेल आपल्याला लवकरात लवकर ती बाधा उतरावी लागणार आहे. त्यासाठी सहा लाख रुपये किमतीचे एक कबुतर विकत घेणे गरजेचे आहे.
भोंदूबाबाने पीडित कुटुंबाला सांगितले की, जर हे सहा लाखांचे कबुतर तुम्ही विकत घेतले तर तुमच्या कुटुंबातील सदस्यांचा मृत्यू टळू शकणार आहे. आणि जादूटोण्यावरून विकत घेतलेल्या कबुतराचा यात मृत्यू होईल. यानंतर घाबरलेल्या कुटुंबाने भोंदू बाबाच्या सांगण्यावरून ते सहा लाखांचे कबुतर विकत घेतले. तसेच अनेक प्रकारच्या भूलथापा मारत या कुटुंबाची जवळपास सहा लाख ऐंशी हजार रुपयांना गंडा घातला.