पुणे : आरोग्यवर्धक म्हणून सहसा प्यायला जाणारा भोपळ्याचा रस प्यायल्याने महिलेचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. कडवट दुधीचा रस प्राशन केल्याने संबंधित महिलेची प्रकृती खालावली आणि त्यातच महिलेचा मृत्यू झाल्याचे दिसून आले आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, या महिलेने १२ जूनला दुधीचा रस प्यायला होता. त्यानंतर अर्धा तासात त्यांना उलट्या आणि अतिसाराचा त्रास सुरु झाला. पुढील तीन दिवसात त्यांची प्रकृती अधिक खालावली आणि १६ जूनच्या रात्री त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती नातेवाईकांनी दिली आहे.
यापूर्वी इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च संस्थेने दिलेल्या अहवालानुसार कडवट चवीच्या आणि जास्त जुन्या झालेल्या भोपळ्याचा रस प्राशन करू नये. असे केल्यास प्रकृतीला धोका उद्भवू शकतो असेही त्यात नमूद करण्यात आले आहे. या महिलेने १२ जूनला ५ किलोमीटर धावण्याचा व्यायाम केल्यावर रोजच्या दिनक्रमानुसार ग्लास भर दुधीचा रस प्यायला होता.त्यानंतर काही वेळातच त्यांना उलट्या आणि अतिसाराचा त्रास सुरु झाला. यासोबत श्वासोच्छ्वास घेण्यास त्रास आणि ओटीपोटातही वेदना व्हायला लागल्या. हा त्रास बघून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले.त्यानंतर व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आणि चार दिवसांनी त्यांचा मृत्यू झाला. याबाबत डॉ हर्षद सराफ यांना विचारले असता त्यांनी काही कडवट दुधी भोपळ्यात असा गुणधर्म असल्याचे आयुर्वेदात नमूद आहे असे सांगितले. त्यामुळे दुधी जरासा जरी कडवट आणि दुर्गंधी येत असल्याची शंका आली तरी त्याचे सेवन टाळायला हवे असा सल्लाही त्यांनी दिला.