पुणे : पुणे महानगर परिवहन महामंडळा (पीएमपी) कडून या ठेकेदारांकडील चालकांना नियमितपणे प्रशिक्षण दिले जात नाही. तसेच वाहन चालक परवाना व बॅचच्या माहितीशिवाय संबंधित चालकाची पुरेशी माहितीही प्रशासनाकडे नाही. ठेकेदारांनी दिलेल्या माहितीवरच विसंबून राहत प्रशासनाकडून संबंधित चालकांच्या ताब्यात बस दिल्या जातात. या परवाना, बॅचशिवाय इतर बाबींची योग्यप्रकारे पडताळणी करण्याची तसदीही घेतली जात नाही. मद्यधुंद अवस्थेत बस चालवून चालकाने प्रवाशांचा जीव धोक्यात घातल्याची घटना रविवारी दुपारी कात्रज ते पद्मावती दरम्यान घडली. या घटनेनंतर चालकाला संबंधित ठेकेदाराने कामावरून काढून टाकले. पण पीएमपी प्रशासनाकडून अद्यापपर्यंत ठेकेदाराला सुचना देण्याव्यतिरिक्त त्यांच्याकडील चालकांबाबत कोणताही ठोस निर्णय घेतलेला नाही. कोणतीही दुर्घटना न घडल्याने या घटनेचे गांभीर्य कमी होत नाही. अधूनमधुन पीएमपी बसचे छोटे-मोठे अपघात होतच असतात. त्यामध्ये ठेकेदारांकडील बसेस प्रमाण पीएमपीच्या मालकीच्या बसेसच्या तुलनेत अधिक आहे. प्रत्येकवेळी प्रशासनाकडून संबंधित ठेकेदारांना सुचना, ताकीद, नोटीस देणे, दंड करण्याशिवाय काहीही केले जात नाही. पीएमपीतील सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ठेकेदारांकडून आगार प्रमुखांकडे चालकांविषयीची माहिती दिली जाते. त्यामध्ये चालक परवाना, बॅच व अन्य माहिती असते. आगारामध्ये परवाना, बॅचची खातरजमा केली जाते. तसेच संबंधित चालक यापुर्वी पीएमपीच्या सेवेत होता की नाही, असल्यास त्याच्यावर कोणत्याही कारणामुळे कारवाई झालेली असल्यास मान्यता दिली जात नाही. अशा चालकांना पीएमपी प्रशासनाने काळ््या यादीत टाकले आहे. मात्र, इतर चालकांची यापूर्वीचा अनुभव, नोकरीची पुरेशी माहिती घेतली जात नाही. ठेकेदाराने दिलेल्या माहितीवरच विसंबून राहिले जाते. तसेच संबंधित चालकांची माहिती आगार पातळीवरच ठेवली जाते. पीएमपीच्या मुख्यालयामध्ये एकत्रित माहिती उपलब्ध होत नाही. त्याची पडताळणीही केली जात नाही. त्यामुळे एखादी घटना घडल्यानंतर संबंधित ठेकेदाराच्या सुपरवायझरचा आधार घ्यावा लागतो. -----------------प्रशिक्षणाची वानवा पीएमपीच्या सेवेतील चालकांना नियमितपणे विविध बाबींचे प्रशिक्षण दिले जाते. त्यांच्या सर्व माहिती मुख्यालयाकडे उपलब्ध असते. मात्र, ठेकेदारांकडील चालकांना अशाप्रकारे प्रशासनाकडून प्रशिक्षण दिले जात नाही. ठेकेदारांकडून असे प्रशिक्षण मिळते की नाही, याबाबतही अधिकाऱ्यांना माहिती नाही. खरेतर संबंधित चालकांना शहरांमध्ये बस चालविण्याचे योग्य प्रशिक्षण देणे गरजेचे आहे. बीआरटी मार्गावर हेच चालक जास्त आहेत. वाहतुकीचे नियम, शिस्त, वक्तशीरपणा, नीटनेटकेपणा, अधिकारी व प्रवाशांशी संवाद, बसमधील तांत्रिक बाबी याविषयी प्रशिक्षण देणे आवश्यक आहे. पण असे प्रशिक्षण दिले जात नाही. ------------ठेकेदारांकडील सुमारे ४५० हून अधिक बस दररोज विविध मार्गांवर धावतात. प्रत्येक आगारामध्ये संबंधित ठेकेदाराचा सुपरवायझर असतो. त्याच्यामार्फत त्यांच्याकडील चालकांचे दैनंदिन मार्ग निश्चित केले जातात. त्यानुसार आगारातील पीएमपीचे अधिकारी संबंधित चालकाच्या ताब्यात बस देतात. तर पीएमपीकडून वाहक दिले जातात. काही चालक शेवटच्या फेरीला मद्यपान केल्याचे प्रकार यापुवीर्ही घडले आहेत. अनेकदा असे प्रकार समोरही येत नाहीत. अनेकदा चालत्या बसमध्ये मोबाईलवर बोलणाऱ्या चालकांवरही कारवाई झाली आहे. वाहतुकीच्या नियमांचेही अनेक चालकांकडून सर्रासपणे उल्लंघन केले जाते. यामध्ये पीएमपीच्या सेवेतील चालकांचाही समावेश आहे. लाखो प्रवाशांचा भरवसा असलेल्या पीएमपीचे काही चालक मात्र त्यांच्या सुरक्षिततेकडे दुर्लक्ष करून संपूर्ण यंत्रणेलाच वेठीस धरत आहेत.
धक्कादायक..! ठेकेदारांचे चालक प्रशिक्षणाविना... पीएमपीकडे माहितीही नाही
By ऑनलाइन लोकमत | Published: October 01, 2018 4:14 PM
पुणे महानगर परिवहन महामंडळा (पीएमपी) कडून या ठेकेदारांकडील चालकांना नियमितपणे प्रशिक्षण दिले जात नाही. तसेच वाहन चालक परवाना व बॅचच्या माहितीशिवाय संबंधित चालकाची पुरेशी माहितीही प्रशासनाकडे नाही.
ठळक मुद्देठेकेदारांकडील बसेस प्रमाण पीएमपीच्या मालकीच्या बसेसच्या तुलनेत अधिक प्रत्येकवेळी प्रशासनाकडून संबंधित ठेकेदारांना सुचना, ताकीद, नोटीस देणे, दंड ठेकेदारांकडील सुमारे ४५० हून अधिक बस दररोज विविध मार्गांवर