पुणे : इंटरनेटच्या जमान्यात वेगवेगळी आमिषे दाखवून फसवणाऱ्यांची काही कमी नाही. याबाबत पोलिसांपासून सर्वजण सारखा इशारा देत असतात, पण जसे फसवणा-यांची संख्या कमी नाही तसेच त्यांच्या आमिषालाही बळी पडणा-यांची संख्या घटत नाही. मनमाड येथील हिंदुस्थान पेट्रोलियमचे व्यवस्थापक म्हणून काम करणारे एक इंजिनीयर तब्बल 5 वर्षे या आमिषाला बळी पडले आणि आपले 1 कोटी 85 लाख रुपये गमावून बसले. त्यानंतर त्यांना आपली चूक उमजली.सुनील नंदनकर (वय 55, रा. मनमाड, सध्या शेवाळवाडी, मांजरी) यांनी हडपसर पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. याबाबत पोलिसांनी सांगितले की, नंदनकर हे मनमाड येथील हिंदुस्थान पेट्रोलियममध्ये प्रबंधक आहेत. ते शेवाळवाडीत कुटुंबासह राहतात. जुलै 2013मध्ये त्यांना फोन आला. त्यांचा विश्वास संपादन करून दीड लाख रुपयांची पॉलिसी देण्याचा बहाणा केला. तुमचा क्लेम दुसरा घेऊन जात असल्याचे सांगितले. त्यावर विश्वास ठेवून त्यांनी काही रक्कम मोबाईलधारकाने सांगितलेल्या बँक खात्यात भरली. त्यानंतर वेळोवेळी सुरक्षा ठेव जी तुम्हाला काही दिवसात परत मिळेल, असे सांगून त्यांना पैसे भरायला सांगितले.वेगवेगळ्या 15 ते 20 मोबाईलधारकांनी त्यांच्याशी संपर्क साधून त्यांना सातत्याने भुलविले. अशा प्रकारे गेल्या 5 वर्षात 122 वेळा वेगवेगळ्या प्रकारे ते बँकेत पैसे भरत गेले. आतापर्यंत त्यांनी १ कोटी ८५ लाख रुपये भरले. त्यानंतर त्यांना आपली आर्थिक फसवणूक होत असल्याचे लक्षात आल्यावर त्यांनी हडपसर पोलिसांकडे फिर्याद दिली. पोलीस निरीक्षक व्ही. व्ही. खुळे अधिक तपास करीत आहेत.
धक्कादायक ! इंजिनीअरची १ कोटी ८५ लाखांची फसवणूक
By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2018 8:10 AM