पुणे : नोकरी करत असताना त्यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाले. परंतु, कुटुंबाकडून आपल्या प्रेमसंबंधाला विरोध होईल या भीतीने दोघांनी जीवन संपविण्याचा निर्णय घेऊन विष प्राशन केले. त्यात तरुणीचा मृत्यू झाला. तरुण मात्र वाचला. आता पोलिसांनी आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी तरुणावर गुन्हा दाखल केला आहे.
उत्तमनगर पोलिसांनी नांदेड फाटा येथे राहणार्या एका तरुणावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.याप्रकरणी तरुणीच्या वडिलांनी पोलिसांकडे फिर्याद दिली आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची २० वर्षांची मुलगी एका कंपनीत कामाला होती. तेथे तिचे एका तरुणाबरोबर प्रेमसंबंध निर्माण झाले. नंतर त्या तरुणाने नोकरी बदलली. तरीही त्यांचे प्रेमसंबंध कायम होते. प्राथमिक माहितीनुसार दोघांनीही आपल्या प्रेमसंबंधाविषयी घरी सांगितले नव्हते. तरीही आपल्या प्रेमसंबंधाला विरोध होईल, असे या तरुणीला वाटत होते. ४ डिसेंबर रोजी ते जांभळी येथील निळकंठेश्वर येथे गेले होते. जर आपले प्रेम सफल होत नसले तर आपण एकत्र जीवन संपवू, असा विचार करुन दोघांनी विष प्राशन केले. त्यानंतर त्यांना त्रास होऊ लागल्याने तरुणाने आपल्या मित्राला व एका नातेवाईकाला फोन करुन बोलावून घेतले. विष प्राशन केल्याचे समजल्यावर त्यांनी तेथे जाऊन दोघांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, तरुणीच्या अंगात विष अधिक भिनले होते. त्यामुळे ती अत्यवस्थ होती. दोन तीन दिवसांनी तरुणाची तब्येत व्यवस्थित झाली. या तरुणीला ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथे तिची चाचणी केली असता तिला कोरोनाचा संसर्ग झाल्याचे निष्पन्न झाले. उपचार सुरु असताना १४ डिसेंबर रोजी रात्री तिचा मृत्यु झाला. तरुणीच्या मृत्युनंतर आता तिच्या वडिलांच्या फिर्यादीवरुन पोलिसांनी तरुणावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.
या तरुणाचा जबाब अद्याप नोंदविण्यात आलेला नाही. त्यामुळे या दोघांनी नेमक्या कोणत्या कारणामुळे विष प्राशन करण्याचा निर्णय घेतला. त्याने विष कोठून मिळविले, याबाबतचा उलघडा झालेला नाही. पोलीस उपनिरीक्षक अनिता दुगावकर अधिक तपास करीत आहेत.