पिंपरी - न्यायालयात हजर करण्यात आलेली महिला आरोपी कोरोना पॉझिटिव्ह असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यामुळे न्यायालय परिसरात कामकाजासाठी आलेले वकील, नागरिक, तसेच इतर लोकांत खळबळ उडाली आहे. (Shocking! The female accused who appeared in court were Corona Positive)
या महिला आरोपीला पिंपरी पोलिसांनी चोरीच्या गुन्ह्यात अटक केली आहे. तिची आरोग्य तपासणीही केली. त्यानंतर तिला मंगळवारी (दि. ९) मोरवाडी न्यायालयात हजर करण्यात आले होते. न्यायालयाने तिला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. त्यामुळे महिला आरोपीला तुरूंगात पाठविण्यापूर्वी नियमाप्रमाणे तिची कोरोना तपासणी केली. त्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. यामुळे आता न्यायालय परिसरात खळबळ उडाली आहे. अॅड. अतिश लांडगे म्हणाले, कोणत्याही आरोपीला अटक केल्यानंतर त्याची आरोग्य तपासणी होते. त्याचवेळी त्याची कारोना तपासणी होणे आवश्यक आहे. कोरोना पॉझिटिव्ह आरोपी महिलेमुळे न्यायालय परिसरात भीतीचे वातावरण आहे. असे प्रकार टाळण्यासाठी आरोपी अटक करतानाच त्याची करोनाची चाचणी करण्यात यावी.
पोलीस उपायुक्त मंचक इप्पर म्हणाले, चोरीच्या गुन्ह्यात अटक केलेल्या आरोपी महिलेची आरोग्य तपासणी केली होती. मात्र, तुरुंगात नेण्यापूर्वी तिची कोरोना चाचणी करण्यात आली. त्यात ती कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले. यानंतर महिला आरोपीच्या हाय रिस्क कॉन्टॅक्टमधील सहा पोलिसांचीही अॅटिजेन तपासणी करण्यात आली आहे. त्यांचा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. तरीही त्यांची आरटीपीसीआर तपासणी करण्यात येणार आहे. सध्या त्यांचे विलगीकरण करण्यात आले असून, खबरदारी घेतली जात आहे.