पुणे: शहरात रेमडेसिविर इंजेक्शनचा तुटवडा जाणवत असताना काळ्या बाजारात चढ्या भावाने इंजेक्शनची विक्री केल्याप्रकरणी एका खासगी रूग्णालयातील कोरोना उपचार केंद्रातील परिचारिकेसह एकाला अटक करण्यात आली आहे. गुन्हे शाखा आणि औषध प्रशासन विभागाकडून (एफडीए) ही कारवाई करण्यात आली.
पृथ्वीराज संदीप मुळीक (वय २२, रा. दत्तनगर) आणि नीलिमा किसन घोडेकर अशी अटक करण्यात आलेल्यांची नाव आहेत. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घोडेकर या हिंजवडीतील एका खासगी रूग्णालयात परिचारिकेचे काम करतात. एफडीएतील निरीक्षक अतिश सरकाळे यांनी यासंदर्भात फिर्याद दिली आहे.
पोलिसांना कात्रज येथील दत्तनगर परिसरात एकजण जादा भावाने रेमडेसिविरची विक्री जादा भावाने करत असल्याची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी सापळा रचून मुळीकला ताब्यात घेऊन त्याच्याकडे चौकशी केली. मुळीक दत्तनगरमधील साईप्रसाद कोविड सेंटरमध्ये काम करत असल्याची माहिती मिळाली. त्याने हिंजवडीतील एका खासगी रूग्णालयात परिचारिका म्हणून काम करणाऱ्या घोडेकर या आपल्या मैत्रिणीकडून रेमडेसिविरइंजेक्शन घेतल्याची माहिती दिली. याप्रकरणी मुळीक आणि त्याची परिचारिका मैत्रीण यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रेमडेसिविर इंजेक्शनच्या काळ्या बाजाराला आळा घालण्यासाठी पोलिसांनी मोहीम हाती घेतली आहे. शहरातील सर्व पोलीस ठाण्यांचे प्रमुख तसेच गुन्हे शाखेच्या दहा पथकांची नेमणूक करण्यात आली आहे. इंजेक्शनची जादा भावाने विक्री होत असल्यास त्वरीत पुणे पोलिसांच्या नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा असे आवाहन पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी केले आहे.