पुणे: कोरोना चाचणीचे बनावट रिपोर्ट देणार्या दोघांना डेक्कन पोलिसांनी अटक केली आहे. जंगली महाराज रोडवरील एका वैद्यकीय चाचणी करणार्या लॅबच्या नावाने आरोपींनी बनावट रिपोर्ट दिल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. हे दोघे गेल्या काही महिन्यापासून कोरोना चाचणीचे बनावट रिपोर्ट देत असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. त्यातून शेकडो जणांना त्यांनी असे बनावट रिपोर्ट दिले आहेत.
सागर अशोक हांडे (वय २५, सध्या रा. ज्ञानेश्वर कॉलनी) आणि दयानंद भीमराव खराटे (वय २१, सध्या रा. वारजे माळवाडी) अशी त्यांची नावे आहेत. दोघांना रविवारी न्यायालयात हजर करण्यात आले असता, त्यांना अधिक तपासासाठी २३ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी मंजूर करण्यात आली.
सागर हांडे आणि दयानंद खराटे हे दोघेही लॅब टेक्निशियन आहेत. गेल्या ३ वर्षापासून ते पुण्यातील विविध लॅबमध्ये काम करत होते. हांडे याने जानेवारीमध्ये नोकरी सोडली आहे. खराटे हा अजूनही एका लॅबमध्ये काम करीत आहेत. मात्र, त्या लॅबमध्ये कोविड १९ ची चाचणी केली जात नाही. गेल्या २ -३ वर्षांपासून हे सँपल घेण्यासाठी लोकांच्या घरी जात असल्याने अनेकांकडे त्यांचे नंबर होते. तसेच खराटे हा कोणाच्या घरी सँपल घेण्यासाठी जात, तेव्हा तेथील लोक तुमच्याकडे कोविडची टेस्ट होते का याची चौकशी करीत. तेव्हा खराटे यांना सांगत की आमच्याकडे टेस्ट होत नाही. पण मी मित्राला सांगतो, तो घरी येऊन सँपल घेईल. त्यानुसार सागर हांडे हा सर्व कीट घालून त्यांच्या घरी जात़ सँपल घेत असे. दोघेही लॅब टेक्निशियन असल्याने त्यांना कोविड रिपोर्टची माहिती होती़ ते दुसर्याच्या रिपोर्टमध्ये फेरफार करुन त्यावरील नाव बदलून लोकांना रिपोर्ट देत असत. त्यांनी अनेकांची अशा प्रकारे फसवणूक केल्याची माहिती डेक्कन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मुरलीधर करपे यांनी दिली.
जंगली महाराज रोडवरील एका लॅबच्या नावाने यांनी बनावट रिपोर्ट दिले होते. त्यांच्या एका ग्राहकाला त्यांनी निगेटिव्ह रिपोर्ट दिला होता. तरी त्याला त्रास होऊ लागल्याने त्याने या लॅबला फोन केला. तेव्हा तेथील लॅब व्यवस्थापकाच्या हा प्रकार लक्षात आल्यावर त्यांनी डेक्कन पोलिसांकडे फिर्याद दिली होती. त्याचा तपास करीत असताना डेक्कन पोलिसांनी सागर हांडे आणि दयानंद खराटे यांना शनिवारी अटक केली होती. दोघेही लोकांच्या घरी कीट घालून जात़ सँपल घेत. त्यामुळे लोकांना संशयही येत नव्हता. सँपल घेतल्यानंतर ते तो फेकून देत व बनावट रिपोर्ट तयार करुन लोकांच्या जीवाशी खेळत होते.
एका कुटुंबातील ८ जणांना दिला निगेटिव्ह रिपोर्ट
या दोघांना अटक केल्याची माहिती मिळाल्यावर वारजे येथील एक जण रविवारी डेक्कन पोलीस ठाण्यात आला. त्याने या दोघांच्या गोरख धंद्यामुळे त्याच्या कुटुंबावर काय संकट कोसळले. त्यांच्या कुटुंबातील एकाचा महापालिकेचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. मात्र, त्यावर त्यांचा विश्वास न बसल्याने त्यांनी ओळखीतून या दोघांकडून कोविडची चाचणी करुन घेतली. त्यांनी पहिला रिपोर्ट निगेटिव्ह दिला. त्यामुळे ते खुश झाले. त्यांनी घरातील ८ - १० जणांची चाचणी करुन घेतली. त्यासाठी त्यांनी प्रत्येकी १ हजार रुपये घेतले. सर्वांचे रिपोर्ट निगेटिव्ह दिले. त्यामुळे ते खुश झाले. रिपोर्ट निगेटिव्ह असल्याने त्यांनी घरात एकमेकांपासून कोणतीही काळजी घेतली नाही. परिणामी एकामुळे सर्वांना कोरोनाची लागण झाली. दोन तीन दिवसांनंतर सर्वांना त्रास सुरु झाला. त्यांनी सरकारी लॅबमधून चाचणी केल्यावर सर्व जण पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले. यांच्या एका रिपोर्टमुळे घरातील सर्व जण पॉझिटिव्ह झाल्याचे ते गृहस्थ सांगत होते.