पिंपरी : भिंतीवरून उडी मारून महिलेने सैन्य दलाच्या प्रीमायसेसमध्ये अनधिकृतपणे प्रवेश केला. तसेच आर्मीच्या क्वाटर्समध्ये बेकायदा वास्तव्य केले. यातून सैन्य दलाच्या जवानांच्या जीवाला धोका निर्माण करीत असल्याच्या संशयावरून महिलेला अटक करण्यात आली. दापोडी येथे सोमवारी (दि. ९) हा प्रकार उघडकीस आला.
एलीसा मनोज पांडे खडका (२६, मूळ रा. लुंबिनी, नेपाळ. सध्या रा. दापोडी) असे अटक करण्यात आलेल्या संशयित महिलेचे नाव आहे. याप्रकरणी उपनिरीक्षक संजय आनंदराव काळे (वय ५६) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सहायक पोलीस निरीक्षक नीलेश वाघमारे यांनी दिलेल्या माहितीनुसार, दापोडी येथे सैनिकी अभियांत्रिकी महाविद्यालय (सीएमई) असून सैन्य दलातील अधिकारी व जवान या ठिकाणी वास्तव्यास आहेत.
आरोपी एलीसा ही २३ मार्च २०२० पासून फुगेवाडी येथील मॅकडॉनल्ड शाॅप येथून भिंतीवरून उडी मारून सीएमई परिसरात अनधिकृपणे प्रवेश करून सीएमईतील आर्मीच्या क्वाटर्समध्ये बेकायदा वास्तव्य करीत होती. सीएमई येथील आर्मीच्या मालमत्तेस तसेच तेथे राहत असलेल्या जवानांच्या जीवाला धोका निर्माण करण्यासाठी आरोपी तेथे बेकायदा राहत असावी, असे फिर्यादीत नमूद केले आहे.
आरोपी एलीसा हिला पोलिसांनी अटक केली असून, तिला गुरुवारपर्यंत (दि. १२) पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. सीएमई परिसरात अनधिकृत प्रवेश करून तेथे बेकायदा वास्तव्य करण्यामागे आरोपी महिलेचा नेमका काय हेतू होता, याबाबत अद्याप समजू शकलेले नाही. त्याबाबत भोसरी पोलीस तपास करीत आहेत.