रांजणगाव सांडस : घरगुती कारणामुळे बायको आणि बहिणीचा वाद झाल्याने रागाच्या भरात निघून गेलेल्या बहिणीने आत्महत्या केली. तिचा शोध घेत असतांना एका विहिरीत मृतदेह आढळला. बहिणीचा मृतदेह पाहून रागाच्या भरात भावाने त्याच्या बायकोचा कुऱ्हाडीने वार करत खून केला. यानंतर घटनेनंतर पतिनेही विषप्राशन करुन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. ही धक्कादायक घटना शिरूर तालुक्यातील मांडवगण फराटा येथील जुनामळा परिसरात गुरुवारी दुपारी घडली.
माया सोपान सातव (वय ३५) असे आत्महत्या केलेल्या बहिणीचे नाव आहे. तर वैशाली समीर तावरे (वय ३०) असे हत्या केलेल्या बायकोचे नाव आहे. तर समीर भिवाजी तावरे (वय ४२) असे आरोपी पतीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मांडवगण फराटा (ता. शिरुर) येथील जुनामळा येथे समीर तावरे, पत्नी वैशाली तावरे आणि समीरची बहिण माया तावरे एकत्र राहत होते. माया हीच्या पतीचे निधन झाल्याने काही दिवसांपासून ती समीर सोबत राहायला होती. माया आणि वैशालीचा घरगुती कारणावरून वाद होते. मात्र, हा वाद विकोपाला गेल्याने रागाच्या भरात माया बुधवारी (दि १७) रात्री घर सोडून गेली. समीर तसेच त्याच्या कुटुंबीयांनी गुरुवारी सकाळी मायाचा शोध घेण्यास सुरुवात केली. तिने त्यांच्या शेतातील विहिरीत उडी मारुन आत्महत्या केल्याचे कळले. शेतात जाऊन समीरने पाहिल्यास मायाची ओळख पटली.
पत्नीच्या त्रासाने बहिणीने आत्महत्या केल्याने पतीचा राग अनावर झाला
पत्नी विशाखा हीच्या त्रासामुळेच तीने आत्महत्या केल्याने समीरचा राग अनावर झाला. त्याने घर गाठत पत्नी विशाखाच्या मानेवर कुऱ्हाडीने वार करत तिचा खून केला. यानंतर त्यानेही घरातील किटकनाशक पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. यानंतर त्याला दौंड येथील रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. त्याची परिस्थीती गंभीर आहे. पोलिसांनी समीरवर खुनाचा तसेच आत्महत्येचा प्रयत्न असे दोन गुन्हे दाखल केले आहे. दोन्ही मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी शिरुर येथे पाठवण्यात आले आहेत. शिरुरचे पोलीस निरीक्षक सुरेशकुमार राऊत यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. घटनास्थळी ठसे तज्ज्ञांना पाचारण करण्यात आले होते. गुन्ह्यात वापरलेली कुऱ्हाड पोलिसांनी हस्तगत केली आहे.
भांडण विकोपाला गेल्याने ही घटना घडली
समीरचे कुटुंब समाजात धार्मिक, अध्यात्मिक म्हणून ओळखले जाते. परंतु त्याची पत्नी व बहीण माया यांच्यातील भांडण विकोपाला गेल्याने ही घटना घडली आहे. माया हिच्या पतीचे निधन झाल्याने ती माहेरीच राहत होती. पुढील तपास पोलीस निरीक्षक सुरेशकुमार राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप कांबळे, पोलीस उपनिरीक्षक स्नेहल सराफले,सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र साबळे, सुभाष जगताप करत आहे.