पुणे: पत्नीला गावी सोडून सासुबरोबर एकत्र राहणार्या जावयाने दररोजच्या घरगुती भांडणाला कंटाळून रागाच्या भरात हाताने मारहाण करुन ओढणीने सासूचा गळा आवळून खून केला. ही घटना बिबवेवाडीतील शेळके वस्ती येथे शनिवारी सकाळी ९ वाजता घडली. पोलिसांनी असिफ दस्तगीर आत्तार (वय २६, रा. शेळकेवस्ती, बिबवेवाडी) याला अटक केली आहे. अनारकली महमद तेरणे (वय ४५) खुन झालेल्या सासुचे नाव आहे. याप्रकरणी मौलाली मंजलापूरे (वय ३१, रा़ मार्केटयार्ड) यांनी फिर्याद दिली आहे.
असिफ हा मंजलापूरे यांच्या पत्नीच्या मामाचा मुलगा आहे. तो मुळचा बेळगाव जिल्ह्यातील हुक्केरी येथील राहणारा आहे. तो ८ ते ९ महिन्यांपूर्वी मंजलापूरे यांच्याकडे आला. त्याने आपले व पत्नीची भांडणे झाली असून मी तिला सोडून दिले आहे. अनारकली ही माझी सासू आहे. मी तिला पळवून आणले असून ती माझी बायको आहे. तिची मुलगी सोनियाही आमच्याबरोबर असल्याचे त्याने मंजलापूरे यांना सांगितले. त्यानंतर मांजलापुरे यांनी ओळखीतून बिबवेवाडी येथील शेळके वस्तीत त्याला भाड्याने खोली घेऊन दिली होती. अनारकली ही नीट जेवण करत नाही. सतत पेसे मागत असते. यावरुन त्यांच्यात रोज भांडणे होत.
३० एप्रिलला त्यांच्यात भांडण झाल्यावर सासूला मारहाण करून असिफ घराबाहेर निघून गेला. रात्रभर रस्त्यावर फिरला. १ मेला सकाळी ९ वाजता तो घरी परतल्यावर त्यांच्यात पुन्हा भांडणे झाली. तेव्हा त्याने रागाच्या भरात ओढणीने तिचा गळा आवळला. ती निपचित पडली. तेव्हा घाबरुन असिफ याने ही गोष्ट मंजलापूरे यांना सांगितली. त्यांनी तातडीने बिबवेवाडी पोलिसांना जाऊन ही हकीकत सांगितली. पोलिसांनी घर जाऊन पाहिले असता अनारकली हिचा मृत्यु झाला होता. पळून गेलेल्या असिफ आत्तार याचा शोध घेऊन पोलिसांनी अटक केली आहे. सहायक पोलीस निरीक्षक राजेश उसगांवकर अधिक तपास करत आहेत.