लक्ष्मण मोरे पुणे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉक डाऊन लागून करण्यात आले असून जिल्हा बंदीही करण्यात आली आहे. परंतू, महावितरणच्या एका कर्मचाऱ्याने त्याच्या ओळखपत्राचा वापर करुन १ मार्च ते २७ एप्रिलदरम्यान पुणे ते फलटण आणि फलटण ते पुणे असा तब्बल आठ वेळा प्रवास केला असून हा कर्मचारी कोरोना बाधित असल्याचे समोर आले आहे. त्याच्या संपर्कात आलेल्या तब्बल २२ जणांचा ‘हाय रिस्क’ गटात समावेश करण्यात आला आहे. त्याच्यामुळे महावितरणला ‘शॉक’ बसला असून त्याच्या काही सहकाऱ्यांनाही लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे.संबंधित कर्मचारी (वय २८) हा महावितरणच्या पुण्यातील अग्निशामक दल उपविभागामध्ये काम करीत आहे. तो मुळचा फलटण तालुक्यातील मिरेवाडी या गावचा रहिवासी आहे. पुण्यात असतानाच त्याला सर्दी-खोकला आणि ताप असात्रास जाणवू लागला होता. पुण्यातील रुग्णालयात तपासणी करुन घेण्याऐवजीत्याने फलटणपर्यंत दुचाकीवरुन अनेकदा प्रवास केला होता. तो २५ एप्रिल रोजी फलटणला गेल्यावर घरी न जाता ग्रामीण उपजिल्हा रुग्णालयात दाखल झाला त्याचा तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला. पुढील उपचारांसाठी त्याला सातारा जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.त्याने यापुर्वी १ ते २ मार्च मिरेवाडी, २ ते १५ मार्च पुणे-पिंपरीचिंचवड, १५ ते १६ मार्च मिरेवाडी, १६ ते २४ मार्च पुणे, २७ मार्च ते ७एप्रिल मिरेवाडी, ७ एप्रिल ते २५ एप्रिल पुणे, २५ ते २७ एप्रिल फलटण असाप्रवास केलेला आहे. या काळात त्याचा गावात असलेल्या कुटुंबियांसह पुण्यातील त्याच्या सहका-यांसोबत निकटचा संपर्क आला आहे. त्याच्या पुण्यातील खोलीवर राहणाऱ्या काही सहकाऱ्यांसह एकूण बारा जणांना क्वॉरंटाईन करण्यात आले असून त्याच्या कुटुंबातील सहा जणांवर फलटण येथे उपचार सुरु आहेत. प्रवासदरम्यान सातारा-पुणे सीमेवर पुरंदर येथे त्याची पोलिसांनी चौकशी केली होती. त्या पोलिसांचा शोध घेऊन त्यांचीही तपासणी करण्याची आवश्यकता आहे.दरम्यान, सातारा जिल्हाधिकाऱ्यांनी महावितरणच्या पुण्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना पत्र पाठवित या सर्व प्रकाराची कल्पना दिली. त्याची एक प्रत महापालिका आयुक्तांनाही पाठविण्यात आली आहे. त्याच्या संपकार्तील एकूण २२ जणांचा ‘हाय रिस्क’ गटात समावेश करण्यात आला असून आतापर्यंत बारा जणांचे विलगीकरण करण्यात आले आहे. त्यापैकी तीनजण डॉ. नायडू रुग्णालयात, सातजणऔंध शासकीय रुग्णालयात तर दोघांना सणस मैदानावरील विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे. त्यांचे वैद्यकीय चाचणीचे अहवाल बुधवारी पालिकेलाप्राप्त होणार आहेत. त्यानंतर कितीजण पॉझिटीव्ह अथवा निगेटीव्ह आले आहेत हे स्पष्ट होणार आहे.
धक्कादायक! महावितरणच्या कर्मचाऱ्याने दिला 'कोरोना' चा शॉक; बाधित असूनही आठ वेळा गावी प्रवास
By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2020 1:56 PM
त्याच्या संपर्कात आलेल्या तब्बल २२ जणांचा ‘हाय रिस्क’ गटात समावेश
ठळक मुद्देमहावितरणला ‘शॉक’ बसला असून त्याच्या कुटुंबासह काही सहकाऱ्यांनाही लागण झाल्याचे निष्पन्न