पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) परिक्षेत उत्तीर्ण होऊनही अद्याप नोकरी नसल्याच्या तणावातून व आर्थिक परिस्थितीतून एका तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
स्वप्नील सुनिल लोणकर (वय २४, रा. गंगानगर, फुरसुंगी) असे आत्महत्या करणार्या तरुणाचे नाव आहे. स्वप्निलने आत्महत्या करण्यापूर्वी एक सुसाईड नोट लिहिली असून त्यात ‘एमपीएससी मायाजाल आहे, यात पडू नका’ असे म्हटले आहे.
स्वप्नीलचे वडिल सुनील लोणकर यांचा शनिवार पेठेत बिल बुक बांडिंगचा छोटा प्रिटिंग प्रेसचा व्यवसाय आहे. ते व त्यांची पत्नी असे दोघे हा व्यवसाय पाहतात. स्वप्नील स्थापत्य अभियांत्रिकीची पदवी प्राप्त केली आहे. स्वप्नीलचे आईवडिल हे नेहमीप्रमाणे बुधवारी (३० जून) सकाळी कामानिमित्त घराबाहेर पडले. त्यानंतर त्यांची मुलगी दुपारी साडे चार वाजता घरी आली. तेव्हा स्वप्नीलने त्याच्या खोलीमध्ये गळफास घेतल्याचे तिच्या निदर्शनास आले. तिने हा प्रकार आई वडिलांना कळविला. त्यानंतर त्याला रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्याचा मृत्यु झाल्याचे सांगितले.
स्वप्नीलचे शिक्षण पूर्ण झाल्यापासून तो एमपीएससीच्या परिक्षेची तयारी करीत होता. तो २०१९ च्या पूर्व व मुख्य परिक्षेत उत्तीर्ण झाला होता. मात्र गेल्या दीड वर्षात कोरोनामुळे त्यांची मुलाखत झाली नव्हती. त्याबरोबर त्याने २०२० मध्येही एमपीएससीची परिक्षा दिली होती. त्यातील पूर्व परिक्षा तो उत्तीर्ण झाला होता. वाढते वय आणि नोकरी करुनही कधीही फिटू न शकणारा कर्जाचा डोंगर, घरच्यांच्या व इतरांच्या वाढत्या अपेक्षा या सगळ्या तणावातून त्याने आत्महत्या केल्याचे त्याच्या सुसाईड नोटवरुन दिसून येत आहे.
..........
अडीच वर्षात २८ वेळा प्लेटलेट दान करणारा अवलिया...स्वप्नील हा वेगवेगळ्या उपक्रमात उत्साहाने भाग घेणारा तरुण होता. दहावी परिक्षेत त्याने ९१टक्के गुण मिळवले होते. कर्क रोग, डेंगी अथवा विषाणुजन्य तापाच्या रुग्णाच्या रक्तातील प्लेटलेट अचानक कमी होतात. त्यासाठी सुरु असलेल्या जनजागृतीत स्वप्नील हा हिरीरीने सहभागी झाला होता. त्याने कॉलेजमध्ये शिकत असताना अडीच वर्षात तब्बल २८ वेळा प्लेटलेट दान करुन दुर्धर आजाराच्या रुग्णांना जीवदान दिले होते. त्याला १०० जीव वाचवायचे होते. पण आतापर्यंत त्याने २८ वेळा प्लेटलेट दान केले आहेत. आपल्या सुसाईड नोटमध्ये त्याने अजून ७२ जीव वाचवायचे राहिले अशी खंतही व्यक्त केली आहे. गड किल्ल्यांच्या स्वच्छता मोहिमेत तो सहभागी होत असे. अशा या उत्साही तरुणाला एमपीएससीची परिक्षा उत्तीर्ण होऊनही दीड वर्ष मुलाखत न झाल्याने निराशाने ग्रासले व त्यानंतर त्याने टोकाचे पाऊल उचलल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
.......
परीक्षेच्या तारखा जाहीर होत नसल्यामुळे स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणारे विद्यार्थी नैराश्यात आहेत. स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणा-या आमच्या बांधवांना आत्महत्या करावी लागत असेल तर शासनाला जड जाईल.असेच होत राहिल्यास विद्यार्थी राज्यात मंत्र्यांच्या गाड्या रस्त्यावर फिरू देणार नाही.- किरण निंभोरे, एमपीएससी स्टुडेंटस राईट्स--------कोरोनामुळे गेल्या दोन वर्षांपासून कोणतीही परीक्षा झाली नाही.त्यामुळे राज्य शासनाला जागे करण्यासाठी येत्या रविवारी (दि.4) सकाळी 11 ते दुपारी 12 या वेळेत ट्विटर मोहिम राबविली जाणार आहे. संयुक्त पूर्व परीक्षेची तारीख जाहीर करावी,रखडलेल्या सर्व परीक्षांचे वेळापत्रक जाहीर करावे, रखडलेल्या सर्व नियुक्त्यांचा तिढा लवकर सोडवावा, नवीन जागांच्या जाहिरातीचे वेळापत्रक प्रसिध्द करावे, या मागणीसाठी ही मोहित राबविली जाणार असल्याचे एमपीएससी समन्वय समितीतर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.