आळंदी : तीर्थक्षेत्र आळंदीत कोविड संसर्ग प्रतिबंधात्मक लसीकरण नियोजनाचा अभाव आहे. मात्र ग्रामीण रूग्णालयाच्या कर्मचाऱ्यांच्या निवासी सदनिकेच्या पार्किंगमध्ये नॉनव्हेज च्या शाही पार्ट्या होत आहेत. पार्टीचे नियोजन कुणी केले हे कळले नाही. मात्र कोरोना काळातही बुधवारी सायंकाळी पार पडलेल्या या शाही पार्टीची आळंदीत चर्चा रंगली असून एकत्रित येऊन केलेल्या पार्टीबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
गेल्या महिन्याभरात ग्रामीण रूग्णालयामार्फत केल्या जाणाऱ्या लसीकरणात वशिलेबाजी होत असल्याचा आरोप ज्येष्ठ नागरिकांकडून केला जात आहे. तर रेमडेसिविर इंजेक्शनही राजकीय व्यक्तींना वाटप केल्याची शहरात चर्चा आहे. त्यातही लाभार्थ्यांना कर्मचाऱ्यांची अरेरावी सहन करावी लागते. एकीकडे लसीकरणाचे नियोजन नाही. तर दुसरीकडे ग्रामीण रूग्णालयाच्या पार्कींगमध्येच डॉक्टर, कर्मचारी, कर्मचाऱ्यांचे नातेवाईकही पार्ट्यांवर ताव मारत आहेत.
कोविड काळात काम करून कर्मचारी थकले असतील म्हणून पौष्टीक आहार घेत असतील असेही समर्थन काही जण करत आहेत. खरेतर कोविड काळात एकत्रित येऊन पार्ट्या आयोजित केलेल्या आढळून आल्यास पोलिस कारवाई करत आहेत. मात्र याठिकाणी हाकेच्या अंतरावर असलेल्या पोलिसांना पार्टीचा थांगपत्ताही लागला नाही.
याबाबत ग्रामीण रूग्णालयाचे वैद्यकिय अधिक्षक डॉ. जी. जाधव म्हणाले, आरोग्य कर्मचारी काम करतात म्हणून एका सामाजिक कार्यकर्त्याने जेवण दिले. गैरसमज नको. त्याठिकाणी मर्यादित कर्मचारी होते. तसेच गर्दी बिलकूल नव्हती.