पुणे/बारामती (प्रतिनिधी) - इंदापूर तालुक्यातील काझड येथे मुलाने आई-वडिलांवर धारदार कोयत्याने खुनी हल्ला केल्याची धक्कादायक घटना रविवारी (दि २) दुपारी घडली. या हल्ल्यातआईचा जागीच मृत्यु झाला आहे. वडिल गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.
पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, याबाबत वालचंदनगर पोलीस ठाण्यात वडील पांडुरंग बाबुराव नरुटे (वय ६० रा.काझड, सिधोबाचीवस्ती) यांनी फिर्याद दिली आहे. मुलगा अमित पांडुरंग नरुटे (वय ३१)याने आज दुपारी एक ते दोन वाजण्याच्या सुमारास तुम्ही मला मागेल तेवढे पैसे देत नाही,तुम्ही माझे आई वडील नाहीत .तसेच मला जमीन वाटून देत नाही. या कारणावरून वडील पांडुरंग नरुटे यांना खून करण्याच्या उद्देशाने लाथाबुक्यांने मारहाण केली. तसेच त्यांना लोखंडी धारदार कोयत्याने मारहाण केली. त्यामध्ये त्यांच्या दोन्ही हाताच्या अंगठ्यास व डाव्या हाताच्या दंडावर वार करीत गंभीर जखमी केले. या हल्ल्यात त्यांच्या डाव्या हाताचा अंगठा तुटून पडला. त्यांना ठार मारण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच आई अलका पांडुरंग नरुटे (वय ५५) यांच्यावर तोंडावर, कपाळावर , डाव्या डोळ्यावर, नाकावर कोयत्याने वार करीत गंभीर जखमी केले. यामध्ये त्यांचा जागेवरच मृत्यू झाला. यामध्ये वालचंदनगर पोलिसांनी अमित नरुटे याच्या विरोधात भा.द.वी. कलम-३०२,३०७,३२३,५०४,५०६ नूसार गुन्हा दाखल केला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक बी एन लातूरे याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत.