बारामतीत धक्कातंत्राची चर्चा: लोकसभेसाठी अजित पवारांनी घेतला डमी उमेदवारी अर्ज?
By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2024 03:33 PM2024-04-16T15:33:01+5:302024-04-16T15:35:02+5:30
Ajit Pawar: सुनेत्रा पवार यांच्यासह अजित पवार हे आपला डमी उमेदवारी अर्ज दाखल करू शकतात, असं बोललं जात आहे.
Baramati Lok Sabha ( Marathi News ) :बारामती लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीकडून विद्यमान खासदार सुप्रिया सुळे तर महायुतीकडून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना उमेदवारीची घोषणा झाली आहे. विशेष म्हणजे हे दोन्ही उमेदवार १८ एप्रिल रोजीच आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. मात्र हा उमेवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी बारामतीच्या राजकीय वर्तुळात एक वेगळीच चर्चा रंगू लागली आहे. सुनेत्रा पवार यांच्यासह अजित पवार हे आपला डमी उमेदवारी अर्ज दाखल करू शकतात, असं बोललं जात आहे.
पक्षाने दिलेल्या अधिकृत उमेदवाराचा अर्ज तांत्रिक कारणांवरून बाद झाल्यास दुसरा पर्याय उपलब्ध असावा, यासाठी सर्वच ठिकाणी डमी उमेदवार अर्ज दाखल केले जातात. मुख्य उमेदवारानंतर दुसऱ्या सक्षम पर्यायाकडून असा डमी उमेदवारी अर्ज भरला जातो आणि अर्जांची छाननी होऊन मुख्य उमेदवाराचा अर्ज कायम राहिल्यानंतर डमी उमेदवार आपला अर्ज मागे घेतो. तसंच मुख्य उमेदवाराचा अर्ज बाद झाल्यास डमी उमेदवाराचा अर्ज कायम ठेवला जातो. बारामतीत होत असलेल्या हाय व्होल्टेज सामन्यात दररोज नवनवे ट्विस्ट निर्माण होत आहेत. अशातच सुनेत्र पवार यांच्यासह अजित पवार यांनी डमी उमेदवारी अर्ज घेतल्याची चर्चां रंगत आहे. मात्र याबाबत अद्याप अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून अधिकृतरित्या कसलीही माहिती देण्यात आलेली नाही.
दुसरीकडे, सुप्रिया सुळे यांच्यासोबत डमी उमेदवार म्हणून कोण अर्ज दाखल करणार, याबाबतही उत्सुकता निर्माण झाली आहे.
रोहित पवारांचा अजित पवारांना टोला
राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी अजित पवारांच्या डमी अर्जाची चर्चा सुरू होताच टीकास्त्र सोडलं आहे. "दिल्लीवरून आदेश आले असतील तर दादा काहीपण करतील. आधी शरद पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली काम करताना अजित पवार हे स्वत: आदेश द्यायचे. आज त्यांना दिल्लीचा आदेश ऐकावा लागतो. अजित पवार यांनी उमेदवारी अर्ज भरला आणि दिल्लीवरून आदेश आला की, तुमचा अर्ज कायम ठेवा आणि काकींचा अर्ज मागे घ्या, तर अजितदादांना ते मनाविरुद्ध असलं तरी ऐकावं लागेल. त्यामुळे ते त्याबाबतीत काय करतात हे येणाऱ्या काळात पाहावं लागेल," असा टोला रोहित पवार यांनी लगावला आहे.