लोकमत न्यूज नेटवर्क, हडपसर: वादळी वाऱ्यासह वळवाचा जोरदार पाऊस पडल्याने पुणे-सोलापूर महामार्गालगतचे होर्डिंग कोसळल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना कदमवाकवस्ती ग्रामपंचायत हद्दीतील कवडीपाट टोलनाक्याजवळ असलेल्या गुलमोहर लॉन्स येथे आज दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास घडली आहे. या दुर्घटनेत दोघेजण जखमी झाले आहेत. तर एका घोड्याला मार लागला आहे. मात्र, या घटनेत गाड्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
गेले काही दिवस होर्डिंगबाबत आवाज उठवला जात आहे. मात्र प्रशासन गांभीर्याने घेत नाही . त्यामुळे आज झालेल्या या घटनेने पुन्हा एकदा अनधिकृत व धोकादायक होर्डिंगचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, भरत साबळे (वय-५७, रा. येरवडा, पुणे), अक्षय कोरवी (वय -२७, रा. पुणे) अशी जखमी झालेल्यांची नावे आहेत. सोलापूर महामार्गालगतच्या गुलमोहर लॉन्स येथे शनिवारी एक कार्यक्रम होता . या कार्यक्रमासाठी पुण्यातील बँड पथक येथे वाजविण्यासाठी आले होते. यावेळी गुलमोहर हॉलच्या समोरील पटांगणात वाजंत्री बसले होते. तेथेच एका झाडाखाली घोडा गाडी बांधण्यात आली होती. येथील ओढ्यालगत धोकादायकरीत्या एक होर्डिंग बांधण्यात आलेले आहे.
दरम्यान, शनिवारी दुपारी सव्वा चार वाजण्याचा सुमारास वादळी वारा सह पाऊस सुरु झाला. या पावसात हे धोकादायकरीत्या बांधण्यात आलेले भल्ले मोठे होर्डिंग कोसळले. या होर्डिंगखाली भरत साबळे व अक्षय कोरवी हे दोघे सापडले. तेव्हा या दोघांना नागरिकांनी तातडीने बाहेर काढले व उपचारासाठी दवाखान्यात दाखल केले. तर या दुर्घटनेत घोडाही जखमी झाला आहे.
पुणे-सोलापूर महामार्गावर मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर फ्लेक्स व होर्डिंग्ज आहेत. राष्ट्रीय महामार्गाच्या दोन्ही बाजूस लावण्यात आलेली होर्डिंग्ज प्रवाशांसाठी अडचणीची ठरत असून, या होर्डिंग्जमुळे प्रवासी, पादचारी यांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे. पुणे-सोलापूर महामार्गावर हडपसर, पंधरा नंबर, शेवाळेवाडी, मांजरी, कवडीपाट टोल नाका तसेच सासवड रस्त्यावर भेकराईनगर, मंतरवाडी, उरुळीदेवाची, वडकी या परिसरात असंख्य अनधिकृत फ्लेक्स व होर्डिंग्ज धोकादायकरित्या लावलेले आहेत.