पुणे : कोंढवा खुर्द येथील एका ४ मजली इमारतीच्या विक्रीचा व्यवहार करण्यासाठी कागदपत्रे घेऊन त्यावर एका वर्षात तब्बल २० हून अधिक वेळा व्यवहार करत कोट्यवधींचे कर्ज काढण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. याप्रकरणी मार्केट यार्ड पोलिसांनी ५ महिलांसह सहा जणांना अटक केली आहे. विशेष म्हणजे या ४ मजली इमारतीवर इतके व्यवहार झाले याची मालक असलेल्या चार महिलांना अजिबात कल्पना नव्हती.
अधिक माहितीनुसार, अंजली सत्यदेव गुप्ता, नीरू अनिल गुप्ता, किरण देवेंद्र चढ्ढा आणि सुमन अशोक खंडागळे अशा चार महिलांनी काेंढवा खुर्द येथील मालमत्ता खरेदी केली होती. २००५ मध्ये त्यावर त्यांनी ४ मजली नंदनवन ही इमारत बांधली. चारही कुटुंबे प्रत्येकी एका मजल्यावर राहत होती. त्यांनी घरगुती कारणाने २०२० मध्ये ही इमारत विकण्याचे ठरविले. त्यासाठी त्यांनी विनय पाटील व इतर एजंटांना सांगितले होते. त्यासाठी त्यांनी मालमत्तेचे खरेदी खत व इतर कागदपत्रे त्यांच्याकडे दिली होती. मे २०२१ पासून त्यांची प्रॉपर्टी पाहण्यास लोक येऊ लागले. काही बँकांचे लोकही तिचे मूल्यांकन करण्यासाठी येऊन गेले.
विनय पाटील याने तुमची इमारत जुनी आहे. एरिया चांगला नाही. गर्दीचा आहे, अशी कारणे सांगून खूप लोकांना दाखवावी लागते असे सांगत असे. नोव्हेंबर २०२१ मध्ये एकाशी ३ कोटी ४० लाख रुपयांचा व्यवहार ठरला होता. त्यानंतर कर्ज होत नसल्याचे सांगून पुढे व्यवहार पूर्ण केला नाही. या सर्व काळात ग्राहक व बँकेचे लोक असे मिळून १०० च्या वर लोक इमारत पाहून गेले होते.
दरम्यान, ४ ऑगस्ट २०२२ रोजी कॉसमॉस बँकेचे लोक आले. त्यांनी या महिलांकडे तुम्ही ही मालमत्ता कोणाला विकली का, अशी चौकशी केली. तेव्हा त्यांनी आम्ही कोणाला विकली नाही, असे सांगितले. त्यांच्याकडील कागदपत्रात आमचे हे फोटो नसल्याचे सांगितले.
असा झाला प्रकार उघड
- विनय पाटील याने इतर महिलांना हाताशी धरून हवेली उपनिबंधक कार्यालयात या महिलांचे बनावट कागदपत्र तयार करून फेब्रुवारीत दस्त नोंदणी केली होती. त्याच महिलांना घेऊन पुन्हा त्याच मालमत्तेचे नवीन दस्त नोंदणीसाठी ते आले होते. त्यानंतर तेथील उपनिबंधकाला शंका आली.- तपासणी केल्यावर एकाच प्रकारे सर्व्हे नंबरमध्ये काहीसा बदल करून वर्षभरात २० हून अधिक व्यवहार झाल्याचे आढळून आले. त्यात ३ वेळा ही मालमत्ता बँकांकडे गहाण ठेवून त्यावर दीड कोटी, १ कोटी ४२ लाख रुपयांचे कर्ज काढले गेल्याचे आढळून आले. त्यानंतर उपनिबंधकांनी मार्केट यार्ड पोलीस ठाण्यात याची तक्रार दिली.- पोलिसांनी मूळ मालकांविरुद्ध गुन्हा दाखल केला. प्रत्यक्षात या सर्व प्रकारात त्यांना काहीच माहिती नसल्याचे लक्षात आले. त्यानंतर पोलिसांनी तपास करून या मूळ महिला मालकांच्या जागी उभ्या राहिलेल्या तोतया ५ महिलांसह विनय पाटील याला अटक केली आहे. सहायक पोलीस निरीक्षक मदन कांबळे अधिक तपास करीत आहेत.