पुणे : कोरोना काळात सर्वत्र ऑनलाईन शिक्षण सुरु होते. त्यावेळी शालेय फीसुद्धा ऑनलाईन भरली जात होती. दरवेळी आकारण्यात येणाऱ्या फीच्या तुलनेत ऑनलाईन शिक्षणाची फी कमी घ्यावी असे सरकारकडून सांगण्यात आले होते. तरीही काही खासगी शाळांचा मनमानी कारभार सुरु होता. त्यांनी फी कमी केली नाही. पालकांकडूनही विचारणा होऊ लागली होती. तसेच अनेक तक्रारी पालकांनी शालेय प्रशासनाकडे केल्या होत्या.
पण आता शाळा सुरु झाल्यावर फी मध्ये अजून वाढ करण्यात आली असल्याच्या तक्रारी पालकांनी केल्या आहेत. त्यावर अनेकांनी आक्षेप घेऊनही शालेय प्रशासन माघार घेत नाहीयेत. त्यातच पुण्यात आतापर्यंत शालेय फी ना भरल्याने मुलांना त्रास देण्याच्या घटना समोर येऊ लागल्या आहेत. आज सकाळी पुण्यातील खराडी येथे एका नऊ वर्षाच्या शालेय विद्यार्थ्याला तीन महिन्याची फी न भरल्याने रूममध्ये कोंडून ठेवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कोठारी इंटरनॅशनल स्कुलमध्ये ही घटना घडली आहे.
याबाबत मुलाच्या वडिलांनी सांगितले कि, सोमवारी शाळेचा पहिला दिवस होता. माझा मुलगा सकाळी आनंदात शाळेत गेला होता. त्यानंतर मधल्या सुट्टीत १० वाजता शाळेतील बाईंनी त्याला वगातून बाहेर आणले. व एका रूममध्ये ठेवले. त्या रूममध्ये काही खेळणी असल्याची शाळा प्रशासनाने सांगितले आहे. माझे जानेवारीपासून फीचे पैसे राहिले होते. तीन महिन्याची एकूण ३० हजार भरायचे होते. आम्हाला ऑनलाईन पैसे द्यावे लागतात. पण टेक्निकल इश्यूमुळे काही करता आले नाही. त्यांच्याकडे माझे २५ हजार डिपॉजिट असूनही माझ्या मुलाला डांबून ठेवले. हे चुकीचे आहे. मुलांवर असा अन्याय होता काम नये. याची प्रशासनाने दाखल घेणे गरजेचे आहे असाही ते यावेळी म्हणाले आहेत.