पुणे : एक छोटे हॉटेल तो चालवत असे. त्याचा वेश अगदी गबाळा होता. कधीही तो टापटीप कपडे घालत नसे. त्यामुळे कोणालाही त्याच्याविषयी संशयही येत नसे. त्यामुळे तो गेली चार वर्षे त्याचे काम बिनभोबाटा सुरु होते. पोलिसांना याची खबर लागली. त्यांनी त्याच्यावर नजर ठेवून त्याला जाळ्यात पकडले. तेव्हा गबाळा दिसणारा हा एक आंतरराष्ट्रीय सेक्स रॅकेट चालवत असल्याचे आढळून आले.
राहुल सन्यासी (वय ३०, रा. लोहगाव) असे या एजंटाचे नाव आहे. त्याच्याबरोबरील उजबेकिस्तान, नेपाळ, दिल्ली आणि मुंबई येथील चार महिलांना ताब्यात घेण्यात आले आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राहुल सन्यासी हा मुळचा आसाम येथे राहणार आहे. पुण्यात गेल्या काही वर्षांपासून रहातो. चायनीजची गाडी, छोटे हॉटेल तो दाखवायला चालवत असे. त्याचा मुळ व्यवसाय वेश्या व्यवसायासाठी मुली पुरविणे हा होता. विमानतळ पोलीस ठाण्यातील पोलीस अंमलदार सचिन जाधव यांना साकोरेनगर येथे एक जण खासगी वाहनातून काही मुलींना वेश्या व्यवसायाकरीता घेऊन फिरत असल्याचे माहिती मिळाली. त्यानुसार बनावट ग्राहकाद्वारे त्याच्याशी संपर्क करण्यात आला. साकोरेनगर येथे तो दोन रिक्षामधून चार तरुणींना घेऊन आल्यावर पोलिसांनी त्याला छापा घालून पकडले. त्यांच्याकडून २ माबाईल, ५ हजार रुपये व इतर साहित्य असा १ लाख ९२ हजार रुपयांचा माल जप्त करण्यात आला.
अशी होती त्याची पद्धत
राहुल हा फक्त व्हाटसॲप मेसेज व कॉलवर बोलत असे. कोणी ग्राहक आला की त्याच्याकडून अगोदर तो १ ते २ हजार रुपये घेत. त्यानंतर त्याला हॉटेलमध्ये रुम बुक करायला सांगत. रुम बुक केली की तो स्वत: मोटारसायकल किंवा रिक्षाने तरुणीला तेथे पाेहचत असत. त्यापुढील व्यवहार या तरुणीच करीत असे. त्यातील निम्मे पैसे तो घेत असे.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक भरत जाधव, पोलीस निरीक्षक मंगेश जगताप, पोलीस उपनिरीक्षक मंगल जोगन, पोलीस अंमलदार सचिन जाधव, प्रदीप मोटे, गणेश गायकवाड, रुपेश तोडेकर, कांबळे, बुर्हाडे यांनी ही कामगिरी केली.