पुणे: पोहताना मित्राची टिंगल केल्याने थेट कठड्यावरुन विहिरीत ढकलून दिल्यामुळे तरुणाचा मृत्यु झाल्याचा प्रकार पोलीस तपासात उघड झाला आहे. ही घटना हडपसरमधील फुरसुंगी परिसरातील शेवाळेमळा येथे ७ एप्रिलला घडली.
रेहमान अन्सारी ऊर्फ प्रशांत वणवे (वय १६)असे मृत्यु झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी हडपसर पोलिसांनी दोघांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. रोहित प्रदीप कदम (वय २१, रा. मांजरी बुद्रुक) आणि सिद्धार्थ म्हासोळे अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी प्रशांत वणवे (वय ३५, रा. हडपसर) यांनी फिर्याद दिली आहे.
रेहमान, रोहित आणि सिद्धार्थ मित्र असून मांजरी बुद्रूक परिसरात राहायला आहेत. ७ एप्रिलला तिघेही मित्र शेवाळेमळा परिसरातील एका विहीरीत पोहण्यासाठी गेले होते. त्यावेळी रेहमान विहीरीच्या कठड्यावर उभा होता. अचानकपणे रोहितने त्याला विहीरीत ढकलून दिले. विहिरीच्या पायर्यांना धडकून रेहमान पाण्यात पडल्यामुळे गंभीररित्या जखमी झाला. रोहित आणि सिद्धार्थने त्याला पाण्याबाहेर न काढता पळ काढला. घटनेबाबत कोणालाही माहिती होऊ नये यासाठी सिद्धार्थने रेहमानचा मोबाईल फेकून दिला असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी हडपसर पोलीस तपास करत आहेत.