लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : सुनेचा छळ केल्याप्रकरणी गुन्हा दाखल असलेल्या उद्योजक गायकवाड पिता-पुत्रांवर तरूणाच्या खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे. व्याजाने पैसे देऊन जागा नावावर करून घेण्याच्या कारणातून हवेत गोळीबार करत तरूणाच्या खुनाचा प्रयत्न केल्याबद्दल काटेनगर पिंपळे सौदागर येथील ६२ वर्षीय महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार पिता-पुत्रासह आठ जणांविरूद्ध चतु:शृंगी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविला आहे. यामध्ये दोन आरोपींना अटक केली असून, त्यांना शुक्रवारी न्यायालयात हजर केले असता दोघांना दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.
नानासाहेब गायकवाड, नंदा नानासाहेब गायकवाड, गणेश नानासाहेब गायकवाड (दोघेही रा. औेंध) दीपक गवारे, सोनाली दीपक गवारे (रा. डेक्कन) राजू उर्फ अंकुश दादा सचिन गोविंद वाळके, संदीप गोविंद वाळके (दोघेही रा. विधाते वस्ती) अशा आठ जणांविरुद्ध खुनाचा प्रयत्न, महाराष्ट्र सावकारकी अधिनियमानुसार गुन्हा दाखल केला आहे. ही घटना डिसेंबर २०२० मध्ये घडली आहे. परिसरात आरोपींची दहशत असल्यामुळे फिर्यादींनी आतापर्यंत पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली नव्हती. यामधील सोनाली दीपक गवारे आणि दीपक निवृत्ती गवारे यांना शुक्रवारी अटक केली.
फिर्यादीच्या मुलाने आरोपी गायकवाड यांच्याकडून व्याजाने पैसे घेतले होते. त्यातून रायगड येथील सात एकर जागा व पिंपळे सौदागर येथील जागा स्वत:च्या नावावर करून घेण्यासाठी फिर्यादी व त्यांच्या मुलाला डिसेंबर २०२० मध्ये घरी बोलावले होते. त्यावेळी नानासाहेब गायकवाड याने त्याच्याकडील पिस्तुलाने हवेत गोळीबार केला. त्यानंतर गणेश गायकवाड व दीपक गावारे याने तरूणाच्या डोक्याला पिस्तूल लावत जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर जबरदस्तीने स्टॅम्प, लिहिलेल्या व को-या पेपरवर सह्या घेतल्या. दोघांना जबरदस्तीने गाडीत बसवून डेक्कन येथील गवारे याच्या घरी कोंडून मारहाण केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
-----------------------------------