पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, याबाबत प्रशांत सोमनाथ चौधर (वय २८, रा. महादेव मंदिराशेजारी, रुई, बारामती) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार चौधर हे कुटुंबीयांसह येथे राहतात. गोदावरी कॉन्ट्रक्टर या नावे ते बांधकामाचा ठेका घेतात. त्यांच्या धाकट्या भावाच्या लग्नाची घरात तयारी सुरू आहे. मंगळवारी (दि. ४) रोजी लॉकडाऊनमुळे ते घरी होते. दुपारी शेतात जाऊन आल्यानंतर रात्री ११ च्या सुमारास हे कुटुंब अंगणात गप्पा मारत बसले होते. त्यावेळी रुई ते अभिमन्यू कॉर्नर रस्त्याने एक जीप आली. या जीपमधील चालकाने फिर्यादीला तुला लय मस्ती आली का, असे म्हणत हवेत तीन गोळ्या झाडल्या. त्यानंतर वेगाने ते वाहन पुढे निघून गेले. अचानक झालेल्या गोळीबाराने हे कुटुंब भयभीत झाले. त्यांनी तातडीने तालुका पोलीस ठाण्याला याची खबर दिली. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. या वेळी तीन रिकाम्या पुंगळ्या आढळून आल्या. अज्ञाताने कोणत्या तरी कारणावरून बंदुकीतून गोळ्या झाडत दहशत माजविण्याचा, कुटुंबाला दहशतीखाली ठेवण्याचा प्रयत्न केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. याप्रकरणी अज्ञाताविरोधात तालुका पोलीस ठाण्यात शस्त्र अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
——————————————