पुणे : जिल्ह्यातील लोकांमध्ये कोरोना संसर्गाचे गांभीर्य कमी होताना दिसत आहे. यामुळेच मास्क न वापरणाऱ्याची संख्या वाढत असून, रस्त्यांवर, बाजारपेठांत लोक गर्दी करत आहे. सध्या रुग्णांची संख्या कमी होत असली तरी पुढील दोन -तीन महिन्यांत पुन्हा मोठ्या प्रमाणात रुग्ण संख्या वाढीची शक्यता व्यक्त केली जात आहे. यामुळेच लोकांनी मास्क वापरणे बंधनकारक असून, यापुढे मास्क न वापरणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे आदेश पोलिस प्रशासनाला दिले असल्याचे जिल्हाधिकारी डाॅ.राजेश देशमुख यांनी सांगितले.
दुकानदार, व्यावसायिक, भाजी विक्रेते यांनी मास्क न वापरल्यास त्यांचे परवाने रद्द करण्यात येतील, असा इशारा देखील देशमुख यांनी दिला.
जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या झपाट्याने कमी होत असली तरी सणासुदीचे दिवस, थंडीची सुरूवात आणि सर्वच गोष्टी खुल्या झाल्याने डिसेंबर,जानेवारीत कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता शासनाने व्यक्त केली आहे. यामुळेच नागरिकांनी पुढील तीन-चार महिने अधिक काळजी घेण्याची गरज आहे. पंरतु गेल्या काही दिवसांत रस्ते, बाजारपेठा, दुकाने, हाॅटेलमध्ये नागरिकांची गर्दी वाढू लागली आहे. अनलाॅक प्रक्रियेत पुन्हा एकदा नागरिकांचे जीवनमान पुर्वपदावर येत असताना कोरोनावर लस येत नाही तोपर्यंत मास्क वापरणे, सुरक्षित अंतर राखणे आणि सॅनिटायझेशन करणे बंधनकारक आहे. परंतु हे सर्वच नियम सध्या नागरिकांकडून धाब्यावर बसवले जात असल्याचे स्पष्ट दिसत आहे. यामुळेच प्रशासनाने पुन्हा एखदा मास्क न वापरणाऱ्यांवर कारवाई करण्याचा निर्णय घेतला असल्याचे देशमुख यांनी स्पष्ट केले.