दादा,दोन महिन्यांपासुन दुकानं बंद, आता उघडण्याची परवानगी द्या : बारामतीत व्यापाऱ्यांचे उपमुख्यमंत्र्यांना साकडं
By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2021 04:08 PM2021-05-29T16:08:50+5:302021-05-29T16:10:05+5:30
मागील दोन महिन्यापासुन ‘ब्रेक द चेन’ अंतर्गत बारामती शहरातील सर्व दुकाने बंद आहेत.
बारामती: बारामती शहरात कोरोना संकट रोखण्यासाठी गेल्या दोन महिन्यांपासुन अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने बंद आहेत. त्यामुळे व्यापारी वर्ग आर्थिक अडचणीत सापडला आहे. त्यातुन बाहेर काढण्यासाठी सर्व व्यापाऱ्यांना दुकाने उघडण्यासाठी परवानगी देण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना साकडे घालण्यात आले आहे.
याबाबत व्यापारी महासंघाचे अध्यक्ष नरेंद्र गुजराथी यांनी पवार यांना निवेदन दिले आहे.त्यानुसार मागील दोन महिन्यापासुन राज्य सरकारच्या आदेशानुसार ‘ब्रेक द चेन’ अंतर्गत बारामती शहरातील सर्व दुकाने बंद आहेत. सर्व व्यापाऱ्यांनी पूर्णपणे या मोहिमेत सहभाग घेतला.तसेच ही मोहीम यशस्वी होण्यासाठी खंबीर साथ दिली.
परंतु, या २ महिन्यात बंदमुळे व्यापाऱ्या ची अडचण देखील वाढलेली आहे. या दोन महिन्यात व्यापार बंद होता. मात्र, कामगारांचा पगार,बँकेचे व्याज, सरकारी टॅक्स,वीजबिल,टेलीफोन बिल,जागा भाडे,नगरपरिषद टॅक्स आदी खर्च मात्र सुरुच होते.या सर्व बाबींमुळे व्यापारी हतबल झाला आहे.आता ही व्यापारी अडचण व्यापारी पेलु शकत नाही. त्यामुळे १ जूनपासुन सर्व व्यापाऱ्यांना दुकाने उघडण्यास परवानगी द्यावी. व्यापारी सर्व नियमांचे पालन करुन व्यापार सुरु करतील, अशी मागणी करण्यात आली आहे.
——————————————————