लोणावळा : लोणावळा शहरातील सर्व दुकाने सोमवार ( दि. १२) पासून रात्री ९ वाजेपर्यत खुली राहणार आहेत. पुणे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डाॅ. राजेश देशमुख यांनी याबाबतचा आदेश रविवारी जारी केला आहे.
राज्यात सध्या सर्वत्र अनलाॅकची प्रक्रिया सुरू असल्याने टप्प्याटप्प्याने निर्बंध कमी केले जात आहेत. सर्वाधिक कोरोना रुग्ण असलेल्या पुणे महानगरपालिका हद्दीत लाॅकडाऊन पाचमध्ये सर्व दुकाने सकाळी ९ ते रात्री ९ दरम्यान खुली ठेवण्याचा आदेश नुकताच आयुक्तांनी दिला होता. त्यानंतर ग्रामीण भागातील व्यावसायिकांनी देखील दुकाने बंद करण्याची वेळ वाढवावी, अशी मागणी केली होती. या मागणीचा आदर करत व अनलाॅक प्रक्रियेत निर्बंध कमी करण्यासाठी पुणे जिल्ह्यातील सर्व नगरपालिका, नगरपंचायती व ग्रामपंचायत हद्दीतली सर्व दुकाने यापुढे सकाळी ९ ते रात्री ९ या कालावधीमध्ये खुली राहतील असा आदेश जिल्हाधिकारी देशमुख यांनी दिला आहे.
काल सकाळी लोणावळा व्यापारी आघाडीच्या अध्यक्षांनी मा. प्रांत यांच्याशी झालेल्या चर्चेनुसार दुकाने रात्री पर्यत खुली ठेवण्याचा संदेश सोशल मिडियावरून दिला होता मात्र याबाबत लोणावळा नगरपरिषदेला काहीच कल्पना नसल्याने त्यांनी व्यापारी आघाडी अध्यक्षांना नोटिस बजावत खुलासा मागविला होता. यामुळे काल दिवसभर व आज दुपारपर्यत शहरातील सर्व व्यावसायकांमध्ये दुकाने बंद करण्याच्या वेळेवरून संभ्रम निर्माण झाला होता. जिल्हाधिकारी यांच्या आदेशामुळे व्यापार्यांच्या मनातील संभ्रम दूर झाला असून शहरातील सर्व दुकाने आता रात्री ९ वाजेपर्यत खुली राहणार आहेत. तर दारुची दुकाने, बार व रेस्टाँरंट यांना रात्री दहा पर्यत वेळ देण्यात आली आहे.