नारायणगाव : नारायणगाव शहरातील अत्यावश्यक सेवांसह सर्व दुकाने सकाळी ७ ते २ वाजेपर्यंत सुरू करण्यात यावीत, अशी मागणी जुन्नरचे तहसीलदार हणमंत कोळेकर यांच्या कडे करण्यात आली आहे, अशी माहिती सरपंच योगेश पाटे यांनी दिली आहे.
नारायणगाव जनरल मर्चंट असोसिएशनचे अध्यक्ष किशोर पोखरणा, जितेंद्र गुंजाळ, आशिष माळवदकर, दीपक वारुळे, कीर्ती भन्साळी, हर्षल मुथ्था, विशाल अडसरे आदी असोसिएशन व व्यापारी बांधव यांनी नारायणगावचे सरपंच योगेश बाबू पाटे यांची भेट घेतली. या भेटीत अत्यावश्यक सेवा व सर्व दुकाने सकाळी ७ ते २ वाजेपर्यंत चालू करण्याचे अधिकार शासनाने स्थानिक स्वराज्य संस्थेला दिले असल्याने ग्रामपंचायतीने सर्व व्यावसायिकांच्या हिताच्या दृष्टीने अत्यावश्यक सेवांसह सर्व दुकाने सकाळी ७ ते २ वाजेपर्यंत चालू करण्याची मागणी सरपंच पाटे यांच्याकडे केली. या मागणीचा विचार करता सरपंच पाटे, ग्रामपंचायत सदस्य आरिफ आतार, राजेश बाप्ते, एजाज चौधरी यांनी तातडीने जुन्नर येथे तहसीलदार हनमंत कोळेकर यांची भेट घेतली.
शासनच्या कोविड -१९ प्रतिबंधात्मक उपाययोजना अंतर्गत प्रतिबंधात्मक आदेशास १ जून २०२१ रोजी सकाळी ७ पासून ते १५ जून २०२१ रोजी सकाळी ७ वाजेपर्यंत मुदतवाढ दिलेली आहे. तसेच त्या आदेशामध्ये ज्या गावामध्ये कोविड रुग्ण संख्या १० टक्क्यांपेक्षा जास्त आहे. तेथील गावातील कोरोना संदर्भात सर्व आदेश हे जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या आदेशानुसार राहील .परंतु ज्या गावामध्ये कोविड रुग्ण संख्या दर १० टक्केपेक्षा कमी आहे. तेथील कोरोना उपाययोजना संदर्भात सर्व अधिकार स्थानिक प्रशासनाला दिले आहेत. त्यानुसार वारूळवाडी नारायणगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्र यांचे रिपोर्टनुसार २८ मे २०२१ ते ३० मे २०२१ चे रुग्णसंख्या ही ३७ पैकी बाधित २ आहे. म्हणजेच कोविड रुग्णसंख्येची टक्केवारी ही १० टक्क्यांपेक्षा कमी आहे. त्यामुळे स्थानिक प्रशासन असलेल्या कोरोना ग्रामदक्षता कमिटी, ग्रामपंचायत, आरोग्य विभाग व पोलीस विभाग यांच्या सर्वसंमतीने नारायणगाव व परिसरातील सर्व दुकाने सकाळी ७ ते दुपारी २ पर्यंत चालू ठेवण्याचा निर्णय व्हावा, असे पत्र तहसीलदार कोळेकर यांना दिले आहे.
०३ नारायणगाव
तहसीलदार हणमंत कोळेकर यांना निवेदन देताना सरपंच योगेश पाटे, सदस्य अरिफ आतार, राजेश बाप्ते.