पुणे : दोन महिन्यांपासून बंद असणाऱ्या बाजारपेठा मंगळवारी काही प्रमाणात का असेना खुल्या झाल्याने व्यापाऱ्यांसह ग्राहकांमध्येही आनंदाचे वातावरण होते. दुकानदार, व्यापारी, व्यावसायिकांनी ‘ग्राहक येती दुकाना, तोचि दिवाळी दसरा’...या भावनेतून ग्राहकराजाचे स्वागत केल्याचे चित्र पुण्या, मुंबईसह राज्यातील २१ जिल्ह्यांमध्ये पहायला मिळाले.कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी राज्य सरकारने कडक निर्बंध घातल्याने व्यापाऱ्यांसह सर्वसामान्य ग्राहकांची कोंडी झाली होता. आता संसर्ग कमी झाल्याने निर्बंध काही प्रमाणात शिथील करण्यात आल्याने बाजारपेठेत नवचैतन्य संचारले होते.पुण्यात कोणी गुलाबपुष्प आणि पेढा देऊन ग्राहकांचे स्वागत केले. ‘करूनी घेऊ आपण व्हॅक्सिनेशन, सुरक्षित करू बाजारपेठ आणि नेशन’, ‘पाऊले चालती दुकानाची वाट, मास्क वापरून खरेदी करू, आपण राहू स्मार्ट’ असा संदेश देणाऱ्या ‘पुणेरी’ रांगोळ्यांच्या पायघड्याही घालण्यात आल्या होत्या. ग्राहकांच्या हातावर आधी ‘सॅनिटायझर’रुपी तीर्थ शिंपडून मगच ग्राहकाला दुकानात घेतले जात होते.दोन महिन्यानंतर बोहणीनाशिक शहरात गेल्या दोन महिन्यापासून दुकाने बंद आहेत. मंगळवारी (दि.१)दुकान उघडले आणि बोहणी झाली. त्यामुळे मोठा दिलासा मिळाला.व्यापाऱ्यांच्या खूप अडचणी आहेत. त्याकडे सरकारने लक्ष पुरवले पाहिजे,त्यांना कर आणि अन्य बाबतीत सवलत दिली पाहिजे. यापुढे कोणतेही निर्बंधघालताना व्यापारी व्यवसायिक त्यांचे अर्थकारण त्यांच्याकडील कामगारकारागिर वर्ग या सर्वच बाबतीत विचार केला पाहिजे. - गिरीश येवला, स्टेशनरी व्यवसायिक, नाशिकखेळण्याचे दुकान सुरू झाल्याने लहान मुले खुश आहेत. घरात राहून त्याच-त्याच खेळण्यांना मुले कंटाळले आहेत. काहींची खेळणी मोडली आहेत. त्या मुळे नवनवीन खेळणी विकत घेण्यासाठी मुलांनी पालकांकडे तगादा लावलेला दिसतो. त्यामुळे दुकानात आल्यानंतर लहान मुले आनंदी दिसत होती. - निलेश पोरवाल, सायकल विक्रेतेथंडावलेले अर्थचक्र पुन्हा सुरू झाल्याने व्यापारी, दुकानदारांचे चेहरे फुललेले होते. ग्राहकांनीही उत्साही गर्दी केल्यामुळे टाळेबंदी उठवल्याच्या पहिल्याच दिवशी अनेकांचा गल्ला चांगलाच भरला. मध्य पुण्यातल्या पारंपरिक बाजारपेठांमध्ये गर्दी उसळली होती. असेच कमीजास्त चित्र २१ जिल्ह्यांमध्ये होते.
ग्राहक येती दुकाना, तोचि दिवाळी दसरा...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 02, 2021 8:20 AM