सुषमा शिंदे-नेहरकर
पुणे : शहराचा ‘पाॅझिटिव्हिटी’ दर एका आठवड्यात साडेसहावरून पाच टक्क्यांपर्यंत खाली आला आहे. यामुळेच शासनाच्या निकषांनुसार पुणे शहराने दुसरा स्तर गाठला आहे. त्यामुळे येत्या सोमवारपासून (दि. १४) शहरातील सर्व दुकाने पूर्ण वेळ सुरू राहण्याची चिन्हे आहेत. माॅल, चित्रपटगृहेदेखील पन्नास टक्के क्षमतेने सुरू होण्याची शक्यता आहे. हाॅटेल पन्नास टक्के क्षमतेने पूर्ण वेळ सुरू होऊ शकतात. लग्न समारंभासारखे सोहळे कार्यालयाच्या पन्नास टक्के क्षमतेने सुरू होतील.
पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत शुक्रवारी (दि. ११) होणाऱ्या साप्ताहिक आढावा बैठकीत यावर शिक्कामोर्तब होईल, असे सूत्रांनी सांगितले. शासनाने निर्धारित केलेल्या निकषांनुसार पुण्यातील ऑक्सिजन खाटांची उपलब्धता, ‘पॉझिटिव्हिटी’ दर या बाबी अनुकूल आहेत.
राज्य शासनाने एक जूनपासून राज्यात ‘अनलाॅक’ची प्रक्रिया सुरू केली आहे. यासाठी पाच स्तर निश्चित करण्यात आले. गेल्या आठवड्यातला पाॅझिटिव्हिटी दर मागील आठवड्यात साडेसहा टक्के होता. तो थेट दीड टक्क्यांनी कमी झाला. म्हणजेच दर शंभर चाचण्यांमागे आता पुण्यात केवळ पाच कोरोनाबाधित आढळत आहेत. यावरून कोरोना संसर्गाची दुसरी लाट आटोक्यात आल्याचे स्पष्ट होत आहे. त्यामुळे पुण्याचा समावेश आता शासनाने निश्चित केलेल्या दुसऱ्या स्तरात झाला आहे.
चौकट
सोमवारपासून हे बदल शक्य
-अत्यावश्यक वस्तू व सेवा संबंधित सर्व दुकाने व आस्थापना आठवड्याचे सातही दिवस, पूर्णवेळ सुरू राहतील.
-अत्यावश्यक वस्तू व सेवा वगळता इतर सर्व दुकाने व आस्थापनादेखील आठवड्याचे सातही दिवस पूर्णवेळ सुरू राहतील.
-मॉल, चित्रपटगृहे, मल्टिप्लेक्स, नाट्यगृहे पन्नास टक्के क्षमतेने पूर्ण वेळ सुरू होतील.
-रेस्टॉरंटस्, हॉटेल, उपहारगृहे, खाणावळी पन्नास टक्के क्षमतेने उघडणार.
-मंगल कार्यालये पन्नास टक्के क्षमतेने सुरू होणार.
-मैदानांमधील खेळ, व्यायाम यास परवानगी.
-दशक्रिया विधी पूर्ववत करता येतील.