लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : अंशत: टाळेबंदीच्या पहिल्या दिवशी रस्त्यावरची खाद्यपदार्थ विक्री व वाहनांची गर्दी प्रत्येक रस्त्यावर रोजच्या इतकीच आहे. पीएमपी नसल्याने दुचाकी वाहने सुसाट सुटलेली दिसतात. कोरोनाच्या वाढत्या संसर्गाला आळा घालण्यासाठी सरकारने अखेर पुण्यात सात दिवसांची अंशत: टाळेबंदी जाहीर केली जाहीर केला. या पहिल्या दिवशी पीएमपीच्या बस, मोठी हॉटेल वगळता सर्व व्यवहार रोजच्या सारखेच होते. रस्त्यावर गाड्या वेगाने धावतच होत्या, खाद्यपदार्थांची विक्री सुरूच होती व रस्त्याच्या कडेला असणारी दुकाने सायंकाळी ६ पर्यंतच सुरू राहणार असल्याने तिथेही गर्दी होतीच. सिंहगड रस्ता, दांडेकर पूल, टिळक रस्ता, बाजीराव रोड, मंडई या मध्य पुण्यातील आजची ही दृश्ये होती. दुकाने सुरू ठेवण्यात काहीच अडचण नसल्याने लक्ष्मी रस्त्यावरची व अन्य ठिकाणची दुकानेही सुरू होती.
पुणे रेस्टॉरंट अँन्ड हॉटेलिअर्स असोसिएशनचे उपाध्यक्ष किशोर सरपोतदार यांनी खाद्यपदार्थांचे एक आऊटलेट दाखवून सांगितले की हे तसेही अनधिकृतच आहे. तरीही ते आजही सुरूच आहे, व्यवस्थित परवानगी वगैरे काढून, नियमित कर भरणाऱ्या अधिकृत हॉटेल मालकाला मात्र ते बंद ठेवावे लागत आहे.
पीएमपीमधील काही कर्मचाऱ्यांचा सवालही आम्हीच कोरोना पसरवतो का असा आहे. प्रवाशांना इच्छित स्थळी सुरक्षीत पोहोचवण्याची जबाबदारी पार पाडणाऱ्या पीएमीपीवरची बंदी खुद्द पीएमपी प्रशासनालाही आश्चर्यकारक वाटत आहे. अनावश्यक गर्दी टाळण्यासाठी जाहीर केलेल्या अंशत: टाळेबंदीला सर्वच थरातून विरोध केला जात आहे. कोरोना रात्रीचाच असतो व दिवसा तो नसतोच असे सरकार समजते आहे का अशी विचारणा होत आहे. सिंहगड रस्त्याच्या एका बाजूच्या पदपथाची तर भाजीमंडईच झाली आहे. गावांमधील भाजी व फळविक्रेत्यांनी हे पदपथ व्यापले आहेत. स्वस्त मिळत असल्याने नोकरदार महिला तसेच पुरुषही पदपथाच्या कडेलाच दुचाकी लावून खरेदी करत असतात.