पुणे : उत्तर प्रदेशातील लखीमपूर (lakhimpur) खिरीमध्ये झालेल्या आंदोलक शेतकऱ्यांवरील हल्ल्याचा आम्ही निषेध करतो. शेतकरी हे उत्पादकाबरोबरच ते विक्रेते असल्याने ते आमचे व्यवसाय बंधूच आहेत. त्यामुळे सोमवारी ११ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या बंदमध्ये आम्ही सहभागी न होता काळ्या फिती लावून हल्ल्याचा निषेध नोंदवणार आहोत, अशी भूमिका पुणे जिल्हा रिटेल व्यापारी संघातर्फे घेण्यात आली आहे, अशी माहिती (Pune District Retail Traders Association) पुणे जिल्हा रिटेल व्यापारी संघाचे अध्यक्ष सचिन निवंगुणे यांनी दिली.
कोरोना काळात व्यापार बंद राहिल्याने खूप मोठे नुकसान सोसावे लागले आहे. त्यामुळे व्यवसाय बंद ठेवणं आर्थिकदृष्ट्या परवडणारे नाही. परंतु, शेतकरी आंदोलनातील शेतकऱ्यांवर गाडी घालून त्यांना ठार मारण्याच्या प्रकाराचा संघटनेच्या वतीने आम्ही निषेध करतो आहोत.
शेतकरी आंदोलनातील उत्तर प्रदेशातील मृत शेतकऱ्यांना संघटनेतर्फे भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात येत असून या हल्ल्याचा निषेध म्हणून सोमवारी काळ्या फिती लावून आम्ही व्यवसाय सुरू ठेवणार आहोत, असेही सचिन निवंगुणे म्हणाले.
महाविकास आघाडीच्या वतीने ११ ऑक्टोबरला ‘महाराष्ट्र बंद’ची हाक
उत्तर प्रदेशातील लखीमपूर येथील घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीच्या वतीने ११ ऑक्टोबरला ‘महाराष्ट्र बंद’ची हाक देण्यात आली आहे. शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या प्रवक्त्यांनी पत्रकार परिषदेत ही घोषणा केली होती. लखीमपूरमधील घटनेवरून राज्यातील जनतेच्या भावना तीव्र असून सोमवारच्या बंदमध्ये त्या निश्चितपणे दिसतील. महाविकास आघाडी या बंदमध्ये पूर्ण ताकदीने उतरणार आहे. लखीमपूरमध्ये संविधानाची हत्या झाली. अन्नदाता शेतकऱ्याला संपविण्याचे षडयंत्र सुरू आहे. महाविकास आघाडी भक्कमपणे शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे, हे कडकडीत बंद पाळून दाखवून देऊ. लोक स्वयंस्फूर्तीने बंद पाळतील. जीवनावश्यक सुविधांना बंदतून वगळण्यात आले आहे असे तिन्ही पक्षाच्या प्रवक्त्यांनी सांगितले आहे.