पुणे : जमिनीच्या व्यवहारातील वादातून पत्रकारावर गोळीबार करुन त्याच्या खूनाचा प्रयत्न केल्या प्रकरणात गुन्हे शाखेच्या पथकाने बंगलुरु येथून श्रेयश मते याला ताब्यात घेतले आहे. श्रेयश मते (वय २१, रा. नांदेड गाव) असे या शॉर्प शुटरचे नाव आहे. त्याला घेऊन पोलिसांचे पथक पुण्याकडे निघाले असून त्याच्याकडे अधिक चौकशी केल्यानंतर या प्रकरणातील सुत्रधार व अन्य महत्वाच्या बाबी समोर येऊ शकतील असे गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त अमोल झेंडे यांनी सांगितले. शहरातील एका दैनिकाच्या उपनगर वार्ताहरावर गोळीबार केल्याप्रकरणी स्वारगेट पोलिसांनी आतापर्यंत ७ जणांना अटक केली आहे. त्याच वेळी अन्य ६ अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले होते़.
फिर्यादी यांच्या नावावर कोणतीही जमीन नाही. मात्र, धायरी येथे वडिलोपार्जित जमीन आहे. सोन्याचा भाव असलेल्या या जमिनीवरुन वाद सुरु आहे. फिर्यादी हे २७ मे रोजी रात्री महर्षीनगर येथून घरी जात असताना दुचाकीवरुन आलेल्या संशयितांनी त्यांच्या डोळ्यात मिरची पावडर टाकून कोयत्याने मारण्याची धमकी दिली. त्याबाबत त्यांनी तक्रार केली होती. त्यानंतर ११ जून रोजी रात्री ते दुचाकीवरुन घरी जात असताना तीन दुचाकीवरुन आलेल्या ५ जणांनी त्यांचा पाठलाग केला. त्यांच्यावर गोळीबार केला. सुदैवाने त्याचवेळी ते खाली वाकल्याने हल्लेखोरांचा नेम चुकला. या गुन्ह्यातील वाढत असलेल्या गांभीर्य लक्षात घेऊन गुन्हे शाखाही तपास करु लागली.
स्वारगेट पोलिसांनी याअगोदर प्रथमेश ऊर्फ शंभू धनंजय तोंडे (वय २०, रा. राजेंद्रनगर, दत्तवाडी) आणि अभिषेक शिवाजी रोकडे (वय २२, रा. नांदेड गाव) या दोघांना अटक केली होती. त्यानंतर आता अल्पवयीनांसह १३ जणांना पकडण्यात आले होते. त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीवरुन पोलिसांनी श्रेयश मते याला बंगलुरु येथून ताब्यात घेतले आहे. श्रेयश मते याच्यावर खूनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा हवेली पोलीस ठाण्यात दोन वर्षांपूर्वी नोंदविण्यात आला आहे.