शेतातून गेलेल्या वीजवाहक तारांमध्ये शॉर्टसर्किट होऊन उसाला आग लागण्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. यामध्ये शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. मात्र वीज वितरण कंपनी अद्यापही कोणतीही उपाययोजना करताना दिसत नाही. किराणा दुकानदार सदाशिव सखाराम भोर यांचा शेवाळवाडी येथे शेतजमीन गट नंबर १७/२/अ/२ या चार एकर क्षेत्रात ऊस असून, हे ऊस पीक १४ महिन्यांचे झाले होते. सदर उसाचे पिकावरून महावितरणची एलटी लाईनची वायर सिंगल फेज व थ्री फेज गेली आहे. याचे शॉर्टसर्किट होऊन उसात ठिणगी पडली आणि उसाला आग लागली. शेजारील शेतजमीन मालक महेश बाळाजी मुळे यांनी आगीची माहिती भोर यांना दिली. शेतकरी सदाशिव भोर, पत्नी वत्सला, मुलगा विनायक, सून वर्षा हे आग विझवण्यासाठी शेताकडे गेले. पाणी टाकून आग विझविण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र उसाला मोठ्या प्रमाणात आग लागल्यामुळे पेटलेला ऊस जळाला आहे. या आगीमुळे संपूर्ण ऊस जळून गेला असून, सुमारे चार लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. यासंदर्भात सदाशिव सखाराम भोर यांनी मंचर पोलिसांत माहिती दिली आहे. वीज वितरण कंपनीने शेतातील धोकादायक वीजवाहक तारा काढून टाकाव्यात, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
शॉर्टसर्किटने चार एकर ऊस जळाला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2021 4:10 AM