लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : लघुपटाच्या रूपातील कलाकृती कायम दुर्लक्षित राहिल्या आहेत. प्रत्यक्षात, चित्रपटांच्या तुलनेत लघुपट अधिक सक्षम आणि ताकदीचे असतात. कमी वेळात प्रभावी संदेश देऊन प्रेक्षकांपर्यंत पोचण्याची ताकद लघुपटांमध्ये आहे. महोत्सवाच्या माध्यमातून लघुपटांना उत्तम व्यासपीठ मिळण्याची गरज आहे, असे मत ज्येष्ठ अभिनेते डॉ. मोहन आगाशे यांनी व्यक्त केले.शॉर्ट फिल्म थिएटरतर्फे राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयात आॅनलाईन इंटरनॅशनल शॉर्ट फिल्म फेस्टिव्हलचे आयोजन करण्यात आले होते. या महोत्सवासाठी ८६७ लघुपटांची नोंदणी झाली होती. यापैैकी निवडक २० लघुपट एकदिवसीय महोत्सवात दाखवण्यात आले. पहिल्या तीन लघुपटांना आगाशे यांच्या हस्ते गौैरवण्यात आले. याप्रसंगी ‘ख्वाडा’ चित्रपटाचे दिग्दर्शक भाऊराव कऱ्हाडे यांना विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी अखिल भारतीय चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराजराजे भोसले, शॉर्ट फिल्म थिएटरचे प्राजक्ता केरुरे, अजित केरुरे, श्रीनिवास कुलकर्णी आदी मान्यवर उपस्थित होते. सतीश जकातदार आणि प्रसाद मिरासदार यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले.भाऊराव कऱ्हाडे म्हणाले, ‘चित्रपटापेक्षा लघुपटांंमधून रसिकांपर्यंत आशय कमी वेळेत पोहोचवता येतो. कमी वेळेत सर्जनशीलता आणि कल्पकता सिद्ध करणे हे लघुपटांमधील सर्वांत मोठे आव्हान असते. मी या क्षेत्रात आलो तेव्हा चित्रपट शिकवणारी संस्था असते, याची तसूभरही कल्पना नव्हती. मी शेत विकून चित्रपट बनवला. या प्रवासातील संघर्ष अजूनही सुरूच आहे. लघुपटातून चित्रपटांच्या दिग्दर्शनाची ऊर्जा आणि उमेद मिळत असते. त्यामुळे तरुण दिग्दर्शकांनी सुरुवातीला लघुपटांवर लक्ष केंद्रित करायला हवे. चित्रपटांकडे वळताना लघुपटाशी जोडलेली नाळ तुटणार नाही, याचीही काळजी घेतली पाहिजे.’राजेभोसले म्हणाले, ‘अखिल भारतीय चित्रपट महामंडळामध्ये लघुपटांसाठी स्वतंत्र विभाग सुरू करण्यात येत आहे. यासाठी दिग्दर्शकांची नोंदणी सुरू करण्यात आली आहे. तरुण दिग्दर्शकांसाठी लघुपट आणि चित्रपटविषयक कार्यशाळा, तज्ज्ञांकडून मार्गदर्शन अशा पद्धतीचे उपक्रम राबवले जाणार आहेत.’ केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर यांनी लघुपट महोत्सवाला फोनवरून शुभेच्छा दिल्या.लघुपटांचा निकाल :प्रथम : अ मिलियन थिंग, इन सर्च आॅफ विठ्ठलद्वितीय : अ ग्रेव्ह अफेअरतृतीय : वल्नाक्षत्रमसर्वोत्कृष्ट दिग्दर्शक : अभिषेक कुलकर्णी सर्वोत्कृष्ट लेखक : सयान मलिक आणि सौम्यश्री घोषसर्वोत्कृष्ट सिनेमॅटोग्राफी : प्रथमेश रंगोलेसर्वोत्कृष्ट एडिटर : संदीप लंकाहसर्वोत्कृष्ट ध्वनी : ओंकार पाटील आणि अभिषेक घागसर्वोत्कृष्ट अभिनेता : राजदत्तसर्वोत्कृष्ट अभिनेत्री : संग्या यदुवंशीउत्तेजनार्थ : अनस्पोक, टमलिंग स्ट्रीट, विटाप
चित्रपटांपेक्षा लघुपट अधिक सक्षम
By admin | Published: May 31, 2017 3:00 AM